बाळासाहेब जवळकर balasaheb.javalkar@expressindia.com

पाऊस सुरू होताच रस्त्यांवर खड्डे, वाहतुकीचा खोळंबा ठरलेला आहे. वीजपुरवठा खंडित होणार, रस्त्यालगतची झाडे उन्मळून पडणार आणि घरांमध्ये पाणी शिरणार, हे प्रकार दरवर्षी न चुकता घडतात. मग, पावसाळा सुरू होण्यापूर्वी या गोष्टींचा विचार करून उपाययोजना का होत नाही? कोणत्याही प्रकारचे नियोजन नाही आणि शासकीय यंत्रणेत समन्वय नावाचा प्रकार नाही हे त्यामागचे कारण आहे. त्यामुळे नागरिकांना मोठय़ा त्रासाला सामोरे जावे लागते. हा अनुभव सध्या उद्योगनगरीतील रहिवाशांना येतो आहे.

गेल्या आठवडाभर सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. उखडलेले रस्ते, घरांमध्ये शिरलेले पाणी, उन्मळून पडलेली झाडे, विजेचा खेळखंडोबा, वाहतुकीचा खोळंबा या नेहमीच्या समस्या पावसाळ्यात नव्याने उद्भवल्या आहेत. शासकीय यंत्रणेचा नियोजनशून्य कारभार आणि समन्वयाचा अभाव असल्याने नागरिकांना मोठय़ा त्रासाला सामोरे जावे लागल्याचे या निमित्ताने पुन्हा दिसून आले.

सततच्या पावसामुळे चिंचवडच्या मोरया गोसावी मंदिराला पाण्याचा वेढा पडला आहे. थेरगावचा केजुबाई बंधारा ओसंडून वाहतो आहे. पवना नदीचे पात्र दुथडी भरून वाहते आहे. शहरातील नदीकाठच्या परिसरात राहणाऱ्या बहुतांश नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे. फुगेवाडी, बोपखेल, सांगवीत मुळानगर, वाकडला कस्पटे वस्ती, निगडी, सेक्टर २२, संग्रामनगर, सम्राटनगर, पिंपरीत संजयनगर, सुभाषनगर, भाटनगर, भोसरीत आदिनाथ सोसायटी अशा विविध भागात नागरी वसाहतींमध्ये पाणी शिरल्याने रहिवाशांची तारांबळ उडाली आहे. महापालिकेने या नागरिकांची तात्पुरती व्यवस्था शाळांमध्ये केली आहे. अनेक भागातील रस्ते पावसामुळे पूर्णपणे उखडले आहेत. अंतर्गत भागात रस्त्यांची चाळण झाली असून जागोजागी खड्डय़ांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. खड्डय़ांमध्ये पाणी साचून राहत असल्याने वाहतूक मंदावली असून अपघाताचे धोकेही वाढले आहेत. मुळातच असलेली वाहतूक कोंडीची समस्या पावसामुळे अधिक तीव्रतेने जाणवते आहे. मेट्रोच्या कामामुळे होणाऱ्या वाहनकोंडीची त्यात भर पडली आहे. मेट्रोचे काम सुरू असलेल्या पट्टय़ात सेवा रस्त्यांवर झालेल्या अतिक्रमणांकडे दुर्लक्ष होत असल्याने दररोज हजारो वाहनस्वारांना मनस्तापाला सामोरे जावे लागते. पाऊस आणि खड्डय़ांमुळे होणारा विलंब त्यात भर घालणारा आहे. शहरात निगडी, प्राधिकरण, सांगवी, रहाटणी, तळवडे अशा विविध ठिकाणी झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या आहेत. सुदैवाने दुर्घटना घडली नाही. पाऊस सुरू झाला की लगेच वीजपुरवठा खंडित होणार, याचा अनुभव शहरवासीयांना येत आहे.

पावसाळा सुरू झाल्यानंतर कोणत्या समस्या उद्भवतात, हे कोणीही सांगू शकते. मात्र, शासकीय यंत्रणेला त्याची माहिती नसावी, हे पटणारे नाही. पावसाळ सुरू होण्यापूर्वी कोणत्याही प्रकारची खबरदारी घेतल्याचे दिसून येत नाही. रस्त्यांवर खड्डे पडू नयेत किंवा पडलेले खड्डे तत्काळ बुजवण्यात यावेत, याचे काहीच नियोजन नसावे, हे न उलगडणारे कोडे आहे. धोकादायक ठरणारी झाडे छाटण्याचे काम वेळीच करायला हवे. मात्र, एखाद्याचा जीव जाण्याची वाट पाहिली जाते, हेच दुर्दैवी आहे. पावसाळ्यात ठरावीक भागातील घरांमध्ये पाणी शिरते, ही वर्षांनुवर्षांची समस्या आहे. मात्र, त्यावर उपाययोजना होत नाही. पावसाळ्यात वारंवार वीजपुरवठा खंडित होतो, तो होणार नाही, अशी व्यवस्था उभी केली जात नाही. प्रशासकीय पातळीवर अनागोंदी असल्यानंतर लोकप्रतिनिधींनी यात लक्ष घातले पाहिजे. मात्र, तेथेही आनंदीआनंद आहे. त्यामुळे शहरवासीयांची सुरक्षा सध्यातरी रामभरोसे आहे.

राष्ट्रवादीचे चिंचवड विधानसभेचे गणित

पिंपरी महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपद आणि तोडपाणी हे एकमेकांना पूरक ठरणारे जुनेच समीकरण आहे. बहुतांश वेळा सत्ताधारी पक्षाची सोय पाहूनच विरोधी पक्षनेत्याची निवड होते. आतापर्यंतच्या विरोधी पक्षानेत्यांची यादी पाहता ठरावीक अपवाद वगळता अनेकांची कामगिरी सुमार ठरली आहे. महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर राष्ट्रवादीने सर्वाधिक सत्ता उपभोगलेल्या अनुभवी योगेश बहल यांना विरोधी पक्षनेता केले. मात्र, त्यांनी सत्ताधाऱ्यांशी उघड शत्रुत्व घेण्याचे टाळले. त्यानंतर, आक्रमक स्वभावाच्या दत्ता साने यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली. भोसरी विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्या साने यांनी पदाचा पुरेपूर उपयोग करून घेतला. अनेक प्रकरणे चव्हाटय़ावर आणून सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करून सोडतानाच वेळप्रसंगी भाजपच्या सोयीची भूमिकाही त्यांनी घेतली. साने यांच्या वाढीवपणाचा त्रास राष्ट्रवादी तसेच भाजपलाही जाणवू लागला. त्यामुळेच मुदत संपल्याचे कारण देऊन त्यांची उचलबांगडी करण्यात आली. पिंपरी आणि भोसरीनंतर राष्ट्रवादीने यंदा चिंचवड मतदारसंघाला संधी दिली. शहरातील सर्वाधिक विकसित पिंपळे सौदागरचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नाना काटे यांना विरोधी पक्षनेतेपद देऊन राष्ट्रवादीने विधानसभेचे गणित मांडले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या चिन्हावर काटे यांनी चिंचवडमधून निवडणूक लढवली होती. तेव्हा आमदार लक्ष्मण जगताप यांच्याकडून ते पराभूत झाले. तेव्हापासूनच जगताप यांच्या विरोधात सातत्याने काटे यांनी मोहीम सुरू केली आहे. त्याच काटे यांना विरोधी पक्षनेता करून साने यांनी तयार केलेली भाजपविरोधाची धार कायम ठेवण्याची भूमिका राष्ट्रवादीने ठेवली आहे. जगताप यांना पराभूत करण्याची महत्त्वाकांक्षा असलेले काटे विरोधी पक्षनेतेपदाला पदाला कितपत न्याय देतील, हे येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल.