पुरातत्त्व विभागाकडे सुपूर्द

लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : चिखली परिसरात एका नवीन घराच्या बांधकामासाठी पाया खोदताना मजुराला सन १७२० ते १७५० या कालखंडातील २१६ सोन्याची नाणी आणि ५२५ ग्रॅम वजनाचा कांस्य धातूचा तांब्या सापडला. या सोन्याच्या नाण्यांचे वजन २ किलो ३५७ ग्रॅम इतके आहे. मजुराने त्याच्या ताब्यात ठेवलेली नाणी आणि तांब्या पोलिसांनी ताब्यात घेऊन पुरातत्त्व विभागाकडे जमा केला.

ही नाणी इतिहासकालीन असून १७२० ते १७५० या कालखंडातील आहेत. या नाण्यांवर उर्दू आणि अरबी भाषेमध्ये राजा मोहमद शाह यांची राजमुद्रा उमटविण्यात आली आहे, माहिती पुरातत्त्व विभागाच्या सहायक संचालकांनी न्यायालयामध्ये सादर केलेल्या माहिती अहवालामध्ये नमद केले आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदाम सालार पठाण याचे सासरे मुबारक शेख आणि मेहुणा इरफान शेख (दोघेही रा. पाथरी, जि. परभणी) हे चार महिन्यांपूर्वी कामाच्या शोधात शहरात आले होते. ते दोघेही पिंपरी येथील विठ्ठलनगर झोपडपट्टी येथे वास्तव्य करीत आहेत. त्या दोघांना एका नवीन घराच्या बांधकामाचा पाया खोदण्याचे काम मिळाले. बांधकामाचा पाया जेसीबीच्या साहाय्याने खोदण्यात आला होता.

त्यामध्ये पडलेली माती काढण्याचे काम ते दोघे करीत होते. हे काम करताना त्यांना मातीमध्ये पाच ते सहा सोन्याची नाणी मिळून आली. ही माहिती मुबारक शेख यांनी त्यांचा जावई पठाण यांना सांगितली. त्यानंतर त्या तिघांनी दुसऱ्या दिवशी दुपारच्या वेळी सोन्याच्या शोधात पायामधील माती काढण्याचे काम सुरू केले असता कास्य धातूचा तांब्या सापडला. त्यामध्ये २१६ नाणी आढळून आली. स्वत:जवळ ठेवून घेतलेली ही नाणी पोलिसांनी त्यांच्याकडून ताब्यात घेतली.