महिलांच्या दृष्टीने पुणे शहर संवेदनशील व्हावे आणि शिक्षणापासून आरोग्यापर्यंत, स्वच्छतेपासून स्वयंपूर्णतेपर्यंत, रोजगारापासून विकासापर्यंत सर्व क्षेत्रात महिलांची प्रगती व्हावी या उद्देशाने पुणे महापालिकेने ‘महिला संवेदनशील शहर तयार करण्यासाठीचा आराखडा’ तयार केला आहे. असा आराखडा व महिला सद्यस्थिती अहवाल तयार करणारी पुणे ही देशातील पहिली महापालिका ठरली आहे.
लोकसंख्येत महिला पन्नास टक्के असल्या, तरी त्यांना आजही अनेकविध प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शहरातील महिलांची सद्यस्थिती व त्यांचे प्रश्न समजावेत आणि त्यातून उपाययोजनांवर चर्चा करून कृती आराखडा निश्चित करावा, या हेतूने पुणे महापालिकेने हा आराखडा तयार करून घेतला आहे. अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेला हे काम देण्यात आले होते. गेली दीड वर्षे हा अहवाल तयार करण्याचे काम सुरू होते आणि सोमवारी महापालिकेत आयोजित एका समारंभात राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा निर्मला सामंत प्रभावळकर यांच्या हस्ते त्याचे प्रकाशन करण्यात आले. महापौर चंचला कोद्रे, खासदार वंदना चव्हाण, आयुक्त कुणाल कुमार, तसेच विद्या बाळ, किरण मोघे, अबेदा इनामदार, डॉ. स्नेहा पळणीटकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
महिलांच्या सद्यस्थितीचा विचार करणारा हा अहवाल देशातील पहिलाच अहवाल आहे. पुणे हे पुरोगामी शहर आहे आणि महिलांसंबंधीचा अहवाल करून घेण्यातही पुणे देशातील पहिले शहर ठरल्याचा अभिमान असल्याचे यावेळी खासदार चव्हाण यांनी  यावेळी सांगितले. इतर शहरेही याचे अनुकरण करतील, असेही त्या म्हणाल्या. अहवाल तयार झाला असला, तरी त्यातील सूचनांची अंमलबजावणी खूप महत्त्वाची आहे. महिलांचा विकास होतो तेव्हाच सर्व समाजाचा विकास होतो, हे लक्षात ठेवून महिलांसाठी तयार होणाऱ्या स्वतंत्र अंदाजपत्रकाच्या माध्यमातून महापालिकेने महिलांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा, अशी अपेक्षा निर्मला सावंत यांनी या वेळी व्यक्त केली.

शहरातील महिलांच्या सर्वागीण विकासासाठी जो अहवाल तयार करण्यात आला आहे त्याची अंमलबजावणी कशी करता येईल यासाठी प्रशासन निश्चितपणे प्रयत्न करेल. अहवालात सुचवलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात आम्ही कुठेही मागे पडणार नाही.
कुणाल कुमार, आयुक्त, पुणे महापालिका