पुणे : गेल्या दोन महिन्यांत तांदळाच्या दरांत दहा ते पंधरा टक्के वाढ झाली आहे. बासमतीच्या विविध प्रकारांत दहा ते पंधरा रुपये, कोलमच्या दरात सात-आठ रुपये, आंबेमोहरच्या दरात दहा रुपये आणि बासमती तुकडा-कणीच्या दरात पाच रुपयांनी वाढ झाली आहे. या भाववाढीमुळे महागाईच्या झळा आणखी तीव्र होणार आहेत.  

‘ऑल इंडिया राइस एक्सपोर्टर्स असोसिएशन’ने दिलेल्या माहितीनुसार बांगलादेश हा भारताकडून नियमित तांदूळ आयात करणारा देश नाही. तरीही यंदा बांगलादेशने आपल्याकडून मोठय़ा प्रमाणात तांदूळ खरेदी केला आहे. बांगलादेशातील नैसर्गिक आपत्तीमुळे तेथे भाताचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे, त्यामुळे बांगलादेश आपल्याकडून तांदूळ खरेदी करीत आहे. त्यासाठी बांगलादेश सरकारने तांदळावरील आयात शुल्क ६५ वरून २५ टक्क्यांपर्यंत  घटवले आहे. 

चीनचीही आपल्याकडून तांदूळ आयात

जगात तांदळाचे सर्वाधिक उत्पादन चीनमध्ये होते. तरीही चीन सध्या आपल्याकडून तांदळाची आयात करीत आहे. चीन आपल्याकडून अख्या तांदळाऐवजी तुकडा तांदूळ खरेदी करीत आहे. त्या तुकडय़ांचे पीठ करून विविध पदार्थ बनवून जगभरात विकत आहे. त्याचबरोबर इराण, इराक आणि सौदी अरेबिया या देशांकडूनही आपल्या तांदळाला मोठय़ा प्रमाणावर मागणी वाढली आहे. त्यात प्रामुख्याने बासमती व शेला बासमती तांदळाला मोठी मागणी आहे. त्यामुळेही तांदळाच्या भाववाढीला चालना मिळाली आहे.

यंदा ४५ हजार कोटींचा बिगरबासमती तांदूळ निर्यात

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारताने २०२१-२२ या आर्थिक वर्षांत जगभरातील सुमारे १५० पेक्षा जास्त देशांना तांदळाची निर्यात केली आहे. त्यातून देशाला मोठय़ा प्रमाणात परकीय चलन प्राप्त झाले आहे. गेल्या वर्षी २०२०-२१ मध्ये १३० लाख टन बिगरबासमती तांदळाची निर्यात झाली होती. त्या तुलनेत यंदा सन २०२१-२२ मध्ये बिगर बासमती तांदळाची निर्यात ३० टक्क्यांनी वाढली असून, ती १७० लाख टन झाली आहे. गेल्या वर्षी २०२०-२१ मध्ये झालेल्या निर्यातीचे मूल्य ३५,५०० कोटी रुपये होते. या वर्षी २०२१-२२ मध्ये झालेल्या बिगरबासमती तांदळाचे मूल्य ४५,००० कोटी रुपये झाले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतात यंदा तांदूळ लागवड क्षेत्रात घट झाली आहे. जुलै महिन्याच्या अखेपर्यंत बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल, पंजाब, हरियाणा या राज्यांमध्ये तांदळाची लागवड सरासरीच्या १० ते १२ टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. या सहा राज्यांमध्ये मिळून या वर्षी भाताची लागवड आतापर्यंत ३८ लाख हेक्टरने कमी झाली आहे. त्यामुळे या वर्षी तांदळाचे उत्पादन घटण्याचा अंदाज आहे. हेही भाववाढीचे एक कारण आहे.  – राजेश शहा, तांदळाचे निर्यातदार