पुणे: कला-क्रीडा क्षेत्रातील नैपुण्यासाठी राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण भरघोस प्रमाणात देण्यात आल्याचे चित्र आहे. यंदा एकूण २ लाख ४६ हजार ६०२ विद्यार्थ्यांना कला क्रीडा नैपुण्यासाठी सवलतीचे गुण देण्यात आले असून, त्यातील १ लाख ७५ हजार ५५८ विद्यार्थ्यांना चित्रकलेसाठी गुण देण्यात आले आहेत. राज्य मंडळाने या बाबतची माहिती दिली.

शास्त्रीय गायन, नृत्य, चित्रकला, लोककला, वादन, नाट्यकला, स्काऊट गाईड, राष्ट्रीय छात्र सेना यासाठी विविध स्तरावर नैपुण्य दाखवलेल्या विद्यार्थ्यांना सवलतीचे अतिरिक्त गुण देण्यात येतात. त्यानुसार गेल्या वर्षी १ लाख ७८ हजार ८६५ विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण देण्यात आले होते.

त्यामुळे यंदा या गुणांचा लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या जवळपास दुपटीने वाढल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, या सवलतीच्या गुणांचा फायदा गुणांची टक्केवारी वाढण्यासाठी होतो.

यंदा लोककला प्रकारासाठी २९ हजार ३२, शास्त्रीय नृत्यासाठी १ हजार ६२८, गायनासाठी २ हजार ३९२, वादनासाठी १ हजार ३७९, क्रीडा नैपुण्यासाठी ३५ हजार ४१७, स्काऊट-गाईडसाठी १ हजार १६४ विद्यार्थ्यांना गुण देण्यात आले आहेत. तर नाटकासाठी केवळ १५, राष्ट्रीय छात्र सेनेसाठी १७ विद्यार्थ्यांनाच सवलतीचे गुण मिळाल्याचे राज्य मंडळाकडून सांगण्यात आले.