पुणे : इयत्ता अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील चौथ्या फेरीतील प्रवेशाची मुदत शनिवारी संपुष्टात आली. या फेरीत प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांपैकी ८६ टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. चार नियमित फेऱ्यांनंतर आता सर्वांसाठी खुला प्रवेश या फेरीचे वेळापत्रक रविवारी (३ ऑगस्ट) जाहीर करण्यात येणार असून, पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही या फेरीत प्रवेशाची संधी मिळणार आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी ही माहिती दिली. अकरावी प्रवेशाच्या चौथ्या फेरीत कॅप प्रवेशासाठी ३ लाख ७२ हजार ६५२ विद्यार्थ्यांनी, तर काेट्यांतर्गत प्रवेशासाठी १३ हजार ८२९ विद्यार्थ्यांनी अर्ज भरला होता. त्यांपैकी ८३ हजार ९४४ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर करण्यात आला होता. प्रवेश निश्चित करण्यासाठी दिलेल्या ३१ जुलै ते २ ऑगस्ट या मुदतीत ७२ हजार ७५२ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला. त्यात केंद्रिभूत (कॅप) पद्धतीने ५२ हजार ८२८, तर राखीव जागांवर (कोटा) १७ हजार ८१४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला.
डॉ. पालकर म्हणाले, ‘चार नियमित फेऱ्यांनंतर आता ‘सर्वांसाठी खुला प्रवेश’ ही फेरी राबवण्यात येणार आहे. त्याचे वेळापत्रक ३ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केले जाणार आहे. या फेरीत आतापर्यंत प्रवेश न मिळालेले विद्यार्थी, अद्यापही नोंदणी न केलेले विद्यार्थी, पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे.’
राज्यातील प्रवेशस्थिती
- एकूण कनिष्ठ महाविद्यालये : ९ हजार ५५२
- एकूण जागा : २१ लाख ४३ हजार ६१०
- चौथ्या फेरीअखेर प्रवेश : ८ लाख ८४ हजार ३७३