पुणे : पुण्यात एकूण ४९ शाळा अनधिकृत असल्याचे निदर्शनास आले होते. शिक्षण विभागाकडून अनधिकृत शाळांपैकी १३ शाळा बंद करण्यात आल्या आहेत. त्यातील दहा शाळांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे अन्य १२ शाळांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यासंदर्भात कार्यवाही सुरू असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी दिली.

पुणे जिल्हा परिषदेने जाहीर केलेल्या अनधिकृत शाळांच्या यादीमध्ये ४९ शाळांचा समावेश होता. त्यातील काही शाळा जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील, तर काही शाळा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आणि काही शाळा पुणे महापालिकेच्या कार्यक्षेत्रात आहेत. अनधिकृत शाळांची यादी प्रसिद्ध करण्याच्या पुढे जाऊन आता शिक्षण विभागाकडून संबंधित शाळांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी दिलेल्या आदेशानुसार शाळांवर कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा >>>पिंपरी- चिंचवडमध्ये अपघाताच सत्र थांबता थांबेना!; निगडित चारचाकीने दोघांना दिली धडक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनधिकृत असलेल्या ४९ शाळांपैकी १३ शाळा बंद करण्यात आल्या आहेत. पाच शाळांना मान्यता मिळालेली असून, तीन शाळांना शासनाकडून इरादा पत्र प्राप्त झालेले आहे. ४ अनधिकृत शाळांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तसेच १२ शाळांनी दंड भरला आहे. उर्वरित १२ शाळांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येत आहे. त्याशिवाय खामशेत येथील जिजस क्राइस्ट इंग्लिश मीडिअम स्कूल, लोणावळा रायवूड येथील किंग्ज वे पब्लिक स्कूल, फुरसुंगी येथील ईएमएच इंग्लिश मीडिअम स्कूल, लोणी काळभोर रामदरा येथील रामदास सिटी स्कूल, उंड्री येथील ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल, चिंचवडेनगर येथील लिटिल स्टार इंग्लिश मीडीअम स्कूल, चिंचवड लिंकरोड येथील ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल, पिंपळे गुरव येथील आयडियल इंग्लिश मीडिअम स्कूल, पिंपळे निलख येथील पिपल ट्री एज्युकेशन ट्रस्ट गांधीनगर, कोंढवा खुर्द येथील तक्वा एज्युकेशन ट्रस्ट संचालित टीम्स तक्वा इस्लामिक स्कूल या १० शाळांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती संजय नाईकडे यांनी दिली.