पुणे : दिवाळीच्या काळात निष्काळजीपणे फटाके उडविल्याने मागील चार वर्षांत आगीच्या १३५ घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी दिवाळीच्या सणाचा आनंद साजरा करताना आणि फटाके उडविताना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले जात आहे. महापालिकेच्या अग्निशामक दलाकडून यंदाच्या वर्षी फटाके सुरक्षा जनजागृती विशेष मोहीम राबविली जात आहे.
दिवाळी हा आनंदाचा सण आहे. या सणाच्या काळात शहरातील विविध भागांत मोठ्या आवाजाचे फटाके फोडले जातात. फटाके उडविताना झालेल्या निष्काळजीपणामुळे अनेक ठिकाणी आग लागण्याच्या घटनादेखील घडतात. या घटना टाळण्यासाठी महापालिकेच्या अग्निशामक दलाकडून नागरिकांमध्ये जनजागृती केली जाणार आहे.
गेल्या चार वर्षांमध्ये शहरात फटाक्यामुळे १३५ आगीच्या घटना घडल्या. यामध्ये २०२१ मध्ये २१, २०२२ मध्ये १९, २०२३ मध्ये ३५ आणि २०२४ मध्ये ६० घटनांचा समावेश आहे. यंदा दिवाळी सुरक्षित साजरी होण्यासाठी आणि आगीचे अपघात टाळण्यासाठी महाापालिकेच्या अग्निशामक दलाकडून फटाके सुरक्षा जनजागृती विशेष मोहीम राबविली जात आहे, अशी माहिती अग्निशामक दलातील अधिकाऱ्यांनी दिली.
सणाच्या काळात निष्काळजीपणा टाळून दिवाळीचा आनंद टिकवून सुरक्षितता अबाधित राहण्यासाठी महापालिकेच्या सर्व २३ अग्निशामक केंद्रांना सतर्क ठेवण्यात आले असून, नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत ठेवण्यात आला आहे. याशिवाय शहरातील ज्या भागात फटाके विक्रीची दुकाने आहेत, तेथे अग्निशामक दलाची वाहने गस्त घालत असून, मेगा फोनद्वारे जनजागृती संदेश दिले जात आहेत.
दिवाळीत ही काळजी नागरिकांनी घ्यावी
– फटाके मोकळ्या जागेतच फोडावेत. गर्दीच्या भागात, इमारतीजवळ किंवा वाहनांजवळ फटाके फोडू नयेत.
– फटाके हातात धरून पेटवू नयेत किंवा अर्धवट फटाके पुन्हा पेटवण्याचा प्रयत्न करू नये.
– लहान मुलांना फटाके फोडू देऊ नयेत.
– फटाके फोडताना किमान पाच मीटर अंतरावर उभे राहावे.
– फटाके फोडताना नायलॉनचे कपडे वापरू नयेत, सुती कपडे वापरावेत.
– पेटते दिवे, मेणबत्त्या आणि अगरबत्ती फटाक्यांच्या जवळ ठेवू नयेत.
– ज्वलनशील द्रव्ये, गॅस सिलिंडर, विजेच्या तारा यांच्या जवळ फटाके फोडू नयेत.
– फटाक्यांचा साठा घरात, वाहनात वा तळमजल्यात ठेवू नये.
– विक्रेत्यांनी फटाक्यांचा साठा ठेवताना अग्निशामक परवानगी घेणे आवश्यक.
– फटाके विक्री केंद्रात अग्निशामक यंत्र ठेवणे बंधनकारक.
– प्रदूषण टाळण्यासाठी शक्यतो ‘ग्रीन फटाके’ वापरावेत.
– आग लागल्यास तत्काळ पाण्याने वा वाळूने आग आटोक्यात आणावी आणि नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा.