पुणे : जिल्ह्यातील १७ नागरिक हिमाचल प्रदेश राज्यात पर्यटनासाठी गेले आहेत. हिमाचल प्रदेशात अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे हे पर्यटक अडकले होते. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने सर्व पर्यटकांशी संपर्क साधला असून पुण्यातून हिमाचल प्रदेशात गेलेले सर्व नागरिक सुरक्षित असल्याचे बुधवारी स्पष्ट करण्यात आले.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने गेल्या दोन दिवसांत १७ पैकी दहा पर्यटकांशी संपर्क करण्यात यश मिळविले होते. बुधवारी दुपारपर्यंत इतर सात पर्यटकांसोबत देखील संपर्क करण्यात आला. या पर्यटकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून माघारी आणण्यासाठी हिमाचल प्रदेश सरकारसोबत महाराष्ट्र राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाचे कर्मचारी संपर्क करत आहेत. त्यामुळे नातेवाईकांचा जीव भांड्यात पडला आहे.
हेही वाचा >>>भाजपच्या पुणे शहराध्यक्षाचे नाव निश्चित…’यांपैकी’ एकाची होणार निवड
उत्तरेकडील राज्यांत सध्या अतिवृष्टी सुरू असून पूर आला आहे. त्यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या राज्यांत जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर नागरिक पर्यटनासाठी जातात. ४ ते ९ जुलैपर्यंत चंदीगड ते हिमालच प्रदेशातील मनालीमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या १७ नागरिकांशी संपर्क होत नसल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी जिल्हा प्रशासनाला दिली होती. सोमवार आणि मंगळवारपर्यंत यापैकी दहा नागरिकांशी संपर्क झाला होता. ते सुरक्षित स्थळी असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांना देण्यात आली होती. उर्वरित सात नागरिकांशी संपर्क होत नसताना बुधवारी दुपारपर्यंत इतर सर्व पर्यटकांसोबत संपर्क साधण्यात यश आले आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी विठ्ठल बनोटे यांनी दिली.
दरम्यान, यातील एक पर्यटक पंजाब या ठिकाणी पोहोचला असून सर्वांना एकत्रित करून त्यांची व्यवस्था करण्यात येत आहे. नातेवाईकांनी काळजी करू नये, त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे, असेही बनोटे यांनी स्पष्ट केले.