पुणे : आभासी चलनात गुंतवणूक करण्याच्या आमिषाने एका खासगी कंपनीतील कर्मचाऱ्याची १९ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा मुख्य सूत्रधाराला शिवाजीनगर पोलिसांनी रायगड जिल्ह्यातील कर्जत परिसरातून अटक केली. त्याच्याकडून सात मोबाइल संच, दहा सीमकार्ड, बँकांची खाते पुस्तिका, आठ डेबिट कार्ड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
प्रियेश अनिल राव उर्फ शेट्टी उर्फ मुकुल (वय ३४, रा. द मिस्ट सोसायटी, इंदिरानगर, दहिवली, ता. कर्जत, जि. रायगड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी रंजीत जनरैल सिंह (वय ३७, रा. हेरिटेज शांग्रिला, मीरा रोड, जि. ठाणे), शब्बीर शेख (वय ४१, रा. निर्मलनगर, मीरा रोड, जि. ठाणे), सुजाॅय पाॅल (रा. हांडेवाडी रस्ता, हडपसर), मंगेश कदम (रा. गोखलेनगर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एकाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. तक्रारदार शनिवार पेठ भागात राहायला असून शिवाजीनगर भागात त्यांच्या कंपनीचे कार्यालय आहे. आरोपी मुकुल तक्रारदाराच्या संपर्कात आला होता. आभासी चलन खरेदी विक्री करणाऱ्या कंपनीतील प्रतिनिधी अशल्याची बतावणी त्याने तक्रारदाराकडे केली होती. त्यानंतर कंपनीतील प्रतिनिधी असल्याचे सांगून आरेपी रंजीत, शब्बीर, सुजाॅय, मंगेश तक्रारदाराला भेटले. त्यांनी तक्रारदाराला गुंतवणुीकचे आमिष दाखविले.
हेही वाचा >>> पुणे : प्रियकराच्या त्रासामुळे ‘तिने’ रेल्वेखाली केली आत्महत्या; प्रियकर अटकेत
आभासी चलनात गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून तक्रारदाराकडून १९ लाख ७० हजार रुपय घेतले. त्यानंतर तक्रारदाराला परतावा देण्यात आला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. आरोपी मुकुल मुख्य सूत्रधार असल्याची माहिती तपासात मिळाल्यानंतर पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत होता. मात्र, तो राहण्याची ठिकाणे तसेच मोबाइल क्रमांक बदलत असल्याने त्याचा ठावठिकाणा समजला नव्हता. तांत्रिक तपासात मुकुल कर्जत परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती पोलीस कर्मचारी आदेश चलवादी यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. त्याच्याकडून सात मोबाइल संच, दहा सीमकार्ड, आठ डेबिट कार्ड, एक क्युआर कोड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, उपायुक्त संदीपसिंह गिल, सहायक आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, गुन्हे शाखेचे निरीक्षक विक्रम गौड, सहायक निरीक्षक बाजीराव नाईक, रुपेश वाघमारे, आदेश चलवादी, अर्जुन कुडाळकर, रुचिका जमदाडे आदींनी ही कारवाई केली.