पुणे : जिल्हा परिषदेच्या गटांसाठी आणि पंचायत समित्यांच्या गणांच्या प्रारूप मतदारयादीवर २१ हरकती-सूचना नोंदविण्यात आल्या आहेत. त्यावर सुनावणी होऊन येत्या २४ ऑक्टोबरपर्यंत त्या निकाली काढण्यात येतील. त्यानंतर २७ ऑक्टोबरला अंतिम मतदारयादी जाहीर केली जाणार आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या गट आणि गणाच्या प्रारूप मतदारयादी आठ ऑक्टोबरला प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यावर हरकती आणि सूचना दाखल करण्यासाठी १४ ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्या मुदतीअखेर जिल्ह्यातील १३ तालुक्यांमधील काही तालुक्यांमधून हरकती नोंदविण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

जुन्नर, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर, वेल्हा या पाच तालुक्यांमधून एकही आक्षेप नोंदविण्यात आला नाही. आक्षेप नोंदविण्यात आलेल्या तालुक्यांमधून हवेलीतून सर्वाधिक नऊ हरकती-सूचना नोंदविण्यात आल्या आहेत. दौंड, आंबेगाव तालुक्यातून प्रत्येकी दोन तर, खेड आणि शिरूरमधून प्रत्येकी एक-एक हरकत-सूचना नोंदविण्यात आले आहेत.

मावळ आणि मुळशीमधून प्रत्येकी तीन हरकती-सूचनांची नोंद जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे.गट, आणि गणाच्या प्रारूप मतदारयादीवर आलेल्या हरकती आणि सूचनांवर तालुका पातळीवर सुनावणी घेण्यात येणार आहेत. ही प्रक्रिया २४ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.