पुणे : जलशुद्धीकरण केंद्रांत दैनंदिन २१ टन गाळ ; धरणातील गाळ प्रक्रिया करून शुद्ध पाण्याचा पुरवठा

पावसाळ्याच्या कालावधीत गाळाचे प्रमाण ४२ टक्क्यांपर्यंत पोहोचत आहे.

पुणे : जलशुद्धीकरण केंद्रांत दैनंदिन २१ टन गाळ ; धरणातील गाळ प्रक्रिया करून शुद्ध पाण्याचा पुरवठा
( संग्रहित छायचित्र )

धरणांच्या पाणलोट क्षेत्राच्या लगत डोंगर फोडून होत असलेल्या बांधकामांमुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील गाळ जलवाहिन्यांतून थेट महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रात येत आहे. पर्वती, वडगांव आणि भामा-आसखेड जलशुद्धीकरण केंद्रात दैनंदिन २० ते २१ टन गाळ येत असून तो बाहेर काढला जात आहे. दरम्यान, पावसाळ्याच्या कालावधीत गाळाचे प्रमाण ४२ टक्क्यांपर्यंत पोहोचत आहे. धरणातील गाळ जलशुद्धीकरण केंद्रात येत असला तरी योग्य ती प्रक्रिया करून पाणी शुद्ध केले जात असून शुद्ध पाण्याचे वितरण महापालिकेकडून करण्यात येत आहे.

शहर आणि परिसराला पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेकडून धरणातून प्रतीदिन १ हजार ६५० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी धरणातून उचलण्यात येते. तर वर्षाला २२ अब्ज घनफूट (टीएमसी) एवढे पाणी घेतले जाते. बंद जलवाहिनीद्वारे पर्वती जलशुद्धीकरण केंद्रात पाणी आणण्यात येते. यापूर्वी कालव्यातून पाणी विद्युत पंप लावून घेतले जात होते. मात्र पाणी गळती, चोरी रोखण्यासाठी आता बंद जलवाहिनीद्वारे पाणी घेण्यात येत आहे. जलशुद्धीकरण केंद्रात जलवाहिनीतून पाण्याबरोबर माती मिश्रित गाळही येतो. जुन्या जलशुद्धीकरण केंद्रात हा गाळ पाण्यातून वेगळा केला जातो. पर्वती जलशुद्धीकरण केंद्रातून दररोज १२ टन, वडगांव जलशुद्धीकरण केंद्रातून दररोज सहा टन आणि भामा-आसखेड जलशुद्धीकरण केंद्रातून २.५ टन एवढा गाळ बाहेर काढला जात आहे.

जलशुद्धीकरण केंद्रात गाळ मिश्रित पाणी आल्यानंतर पहिल्या टप्प्या क्लोरिन टाकून पाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया केली जाते. विविध पद्धतीने पाणी जलकेंद्रात फिरविले जाते आणि त्यातील माती, कचरा आणि अन्य घटक बाजूला काढले जातात. त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. त्यामुळे गाळ पूर्णपणे वेगळा होता. तो एकत्र करून शेतकऱ्यांना दिला जात असल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. पाणी शुद्ध करताना शास्त्रीय पद्धतीचे काटेकोर पालन केले जात असल्याने पाणी शंभर टक्के शुद्ध होते. दरम्यान, पावसाळ्याच्या कालावधीत जलशुद्धीकरण केंद्रात येणाऱ्या गाळाचे प्रमाणही वाढते. पावसाळ्यात दैनंदिन ४२ टनांपर्यंत गाळ येतो. मात्र जलशुद्धीकरण केंद्रातच गाळ बाजूला काढण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. त्यामुळे पाणी वितरण शुद्ध असते, असेही अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
खंडाळा घाटात दरड कोसळली, पुणे-मुंबई रेल्वेसेवा पूर्णपणे विस्कळीत
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी