पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेसंदर्भात तीन दिवसांपूर्वी आदेश आल्यानंतर आता राज्य सरकारने प्रभागरचना करण्यासाठी वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार ४ सप्टेंबर रोजी अंतिम प्रभागरचना प्रसिद्ध होणार आहे. शहरातील ३२ प्रभागांसाठी तीन हजार १०२ प्रगणक गट आहेत. या गटांच्या मांडणीचे काम सुरू करण्यात आले असून, हे काम १६ जूनपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.

महापालिकेची निवडणूक चार सदस्यांच्या प्रभाग पद्धतीने घेण्यात येणार असल्याचे राज्य सरकारने निश्चित करून प्रभाग रचना करण्याचा आदेश मंगळवारी दिला. मात्र, यामध्ये प्रभाग रचना करण्यासाठी नेमका कालावधी दिला नव्हता. त्यामुळे निवडणूक कधी हाेईल, प्रभाग रचनेला किती कालावधी लागेल, याबाबत प्रशासनासह सर्वच राजकीय पक्षांच्या इच्छुकांमध्ये संभ्रम निर्माण झाला हाेता. नगरविकास विभागाने गुरुवारी प्रगणक गटाची मांडणी, स्थळ पाहणी, नकाशे तयार करणे अशा विविध बाबींच्या साहाय्याने प्रारूप प्रभाग रचना करावी. या प्रभाग रचनेवर हरकती, सुनावणी घ्यावी. सुनावणीनंतर हरकती व सूचनांवरील शिफारस विचारात घेऊन अंतिम प्रभाग रचना राज्य निवडणूक आयाेगाच्या मान्यतेसाठी पाठविणे, आयाेगाने अंतिम केलेली प्रभाग रचनेबाबत अधिसूचना प्रसिद्ध करणे, यासाठी निश्चित कालमर्यादा सरकारने दिली आहे. त्यामुळे ही सर्व प्रक्रिया ४ सप्टेंबर २०२५ अखेरपर्यंत पूर्ण करावी लागणार आहे. या सर्व प्रक्रियेला तीन महिन्यांचा कालावधी जाणार आहे.

राज्य शासनाच्या आदेशानंतर महापालिकेचा निवडणूक विभाग कामाला लागला आहे. प्रारूप प्रभाग रचना तयार करण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. सद्य:स्थितीत आवश्यक असलेले अधिकारी-कर्मचारी निवडणूक विभागाकडे उपलब्ध आहेत. आवश्यकतेनुसार अधिकारी, कर्मचाऱ्यांची मदत घेण्यात येणार आहे. २०११ च्या जनगणनेनुसार असलेले तीन हजार १०२ प्रगणक गट घेतले आहेत. एका गटात ७५० लोकसंख्या आहे. या गटांच्या मांडणीचे काम तत्काळ सुरू करण्यात आले आहे. त्याचे काम १६ जूनपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे निवडणूक विभागाने सांगितले.

मुख्यालयात निवडणूक विभागाचे कार्यालय

निवडणुकीसाठी महापालिका मुख्यालयातील तळमजल्यावर निवडणूक विभागाचे कार्यालय निश्चित करण्यात आले आहे. याच कार्यालयातून निवडणुकीचे कामकाज चालणार आहे.

लाेकसंख्येएवढेच मतदार?

२०११ च्या जनगणनेनुसार शहराची लाेकसंख्या १७ लाख २९ हजार ३५९ आहे. या लाेकसंख्येनुसारच महापालिकेची निवडणूक हाेणार असून, नगरसेवकांची संख्या १२८ राहणार आहे. विधानसभा निवडणुकीवेळी चिंचवड, पिंपरी, भाेसरी आणि भाेर विधानसभा मतदारसंघाचा काही भाग असे १६ लाख २६ हजार ५४० मतदार आहेत. दरम्यानच्या काळात एक लाख मतदार वाढल्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. त्यामुळे जेवढी लाेकसंख्या, तेवढीच मतदारांची संख्या होण्याचा अंदाज आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहरात २०११ च्या जनगणनेनुसार तीन हजार १०२ प्रगणक गट आहेत. या गटांच्या मांडणीचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार प्रभागरचना तयार करण्यात येणार आहे. अविनाश शिंदे, सहायक आयुक्त, निवडणूक विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका