पिंपरी – चिंचवड : शहरात गणपती विसर्जनादरम्यान लेझर लाईट चा वापर करणाऱ्या ४० मंडळांवर कारवाई करण्यात आली आहे. भारतीय संहिता कलम २२३ प्रमाणे ही कारवाई करण्यात आली. सर्वाधिक वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत १७ मंडळांवर कारवाई करण्यात आली.

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी डीजे आणि लेझर लाईट बाबत कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांची करडी नजर होती. गणेश मंडळांनी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात बाप्पाला निरोप दिला. याचदरम्यान अनेक ठिकाणी डिजेचा दणदणाट सुरू होता. लेझर लाईट चा मारा देखील पाहायला मिळाला. अशा ४० मंडळांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

वाकड पोलीस ठाण्यात १७, पिंपरी ०८, निगडी ०५, सांगवी ०५, दापोडी ०३ आणि तळेगाव दभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत ०२ मंडळावर कारवाई करण्यात आली आहे. अद्याप डीजेवर करण्यात आलेल्या कारवाईची आकडेवारी समोर आलेली नाही. डिजेच्या आवाजाची पातळी तपासून मिळालेल्या आकडेवारीवरून कारवाई करणार असल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त विशाल हिरे यांनी दिली आहे.