पिंपरी : वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कुरियर कंपनीचे अधिकारी असल्याचे भासवून पार्सलमध्ये अमली पदार्थ असल्याचे सांगून शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या ६५ वर्षीय महिलेची एक कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना ३ ते ११ सप्टेंबर या कालावधीत पिंपरी-चिंचवडमध्येे ऑनलाइन माध्यमातून घडल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणात सायबर पोलीस ठाण्यात एका ६५ वर्षीय महिलेने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार दोन बँक खातेधारकांसह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे यांनी माहिती दिली.फिर्यादी महिला या शासकीय सेवेतून निवृत्त झाल्या आहेत. त्यांनी पार्सल मागविले होते. पार्सलमध्ये कागदपत्रे, लॅपटॉप आणि अमली पदार्थ सापडले असल्याचे सांगून आरोपींनी फिर्यादीला धमकावले. अटक करण्याची भीती दाखवली. फिर्यादीला बँक खात्यांवर एक कोटी रुपये जमा करण्यास भाग पाडले. पैसे घेतल्यानंतर आरोपींनी कोणतीही रक्कम परत न करता फसवणूक केली. सायबर पोलीस तपास करत आहेत.

एक कोटींची फसवणूक

बिटकॉइनमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एकाची एक कोटी ११ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना भोसरी परिसरात घडली. याप्रकरणात ३६ वर्षीय युवकाने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन महिलांसह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींनी बनावट बिटकॉइन आणि डिजिटल लिंकचा वापर करून फिर्यादीला एक कोटी ११ लाख ८० हजार रुपये गुंतवण्यास भाग पाडले. त्यांनी गुंतवणुकीवर सात कोटी रुपयांचा नफा मिळेल असे खोटे आश्वासन दिले. जेव्हा फिर्यादीने पैसे काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आरोपींनी २० टक्के शुल्काची मागणी केली. रक्कम व नफा परत न करता त्यांची फसवणूक केली. सायबर पोलीस तपास करत आहेत.

नफ्याच्या आमिषाने ५७ लाखांची फसवणूक

शेअर ट्रेडिंगमध्ये १० ते १५ टक्के नफ्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची ५७ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना बालेवाडी येथे घडली.या प्रकरणात ४० वर्षीय व्यक्तीने बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका महिलेसह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी समाजमाध्यमाद्वारे फिर्यादीला एका समूहात सहभागी करुन घेतले. त्यांनी एक लिंकचा वापर करून फिर्यादीस खोट्या शेअर ट्रेडिंगमध्ये पैसे भरण्यास भाग पाडले. संकेतस्थळावर मोठा नफा दाखवून त्यांनी फिर्यादीची ५७ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक केली. बावधन पोलीस तपास करत आहेत.