गुरुवारी दिवसभरात जिल्ह्यातील ७३१ नवीन रुग्णांना करोना संसर्गाचे निदान झाले असून पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील एका रुग्णाचा करोनाने मृत्यू झाला आहे. राज्याच्या साथरोग सर्वेक्षण विभागाने याबाबत माहिती दिली आहे. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे जिल्ह्यातील बहुसंख्य करोना रुग्णांना सौम्य लक्षणे असून ते घरच्या घरी बरे होत असल्याने घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

गुरुवारी दिवसभरात आढळलेल्या ७३१ नवीन रुग्णांपैकी ४४१ रुग्ण पुणे महापालिका क्षेत्रात आहेत. १०६ रुग्ण पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात, तर १८४ रुग्ण जिल्ह्याच्या उर्वरित भागात आढळले आहेत. रुग्णांना दिसणारी लक्षणे अत्यंत सौम्य स्वरूपाची आहेत. मात्र, असे असले तरी संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी विशेषत: जोखीम गटातील रुग्ण, सहव्याधीग्रस्त आणि ज्येष्ठ नागरिकांनी तसेच लसीकरण न झालेल्या नागरिकांनी मुखपट्टी वापरासह सर्व आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. गुरुवारी आढळलेल्या ७३१ नव्या रुग्णांमुळे पुणे जिल्ह्यातील एकूण करोना रुग्णसंख्या १४ लाख ७६ हजार ७७० एवढी झाली आहे. जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ६०८३ वर जाऊन पोहोचली आहे. राज्य सरकारच्या साथरोग सर्वेक्षण विभागाने दैनंदिन अहवालाद्वारे याबाबत माहिती दिली आहे.