पुणे : राज्यात करोनाचा उपप्रकार जेएन.१चा आतापर्यंत एक रुग्ण आढळून आला आहे. या रुग्णाची लक्षणे आणि जेएन.१ उपप्रकाराबाबत इतर बाबी तपासल्या जात आहेत. याबाबत पुढील ४८ तासांत सरकारला अहवाल मिळेल. त्यानंतर हा उपप्रकार किती धोकादायक आहे, हे स्पष्ट होईल, असे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी शुक्रवारी सांगितले. याचबरोबर करोनाच्या वाढलेल्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारला मार्गदर्शन करण्यासाठी विशेष कृती पथकाची स्थापना करण्याची घोषणाही त्यांनी केली.

आरोग्यमंत्री सावंत यांनी राज्यातील वैद्यकीय व्यवस्थेच्या तयारीचा आढावा घेतला. यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले की, राज्यातील आरोग्य व्यवस्थेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आज बैठक झाली. केरळमध्ये जेएन.१ आढळून आल्यानंतर लगेचच आम्ही मॉक ड्रीलचे नियोजन केले होते. त्यानुसार १७ व १८ डिसेंबरला राज्यभरात आरोग्य व्यवस्थांचे मॉक ड्रील झाले. त्यात आरोग्य व्यवस्थेची सज्जता, साधनसामग्री, रुग्णालयातील खाटा यासह इतर बाबींचा आढावा घेण्यात आला. याचबरोबर पूर्वतयारीची पावले उचलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

हेही वाचा – मराठी माणसांच्या हक्कासाठी शिवसेनाप्रमुखांची क्षमा मागणार, विलेपार्ल्यातील मराठी रहिवाशांचे अनोखे आंदोलन

जेएन.१ उपप्रकार पहिल्यांदा केरळमध्ये आढळून आला. केरळमधील अहवाल आम्हाला मिळाला आहे. तिथे मृत्यू झालेल्या तीन रुग्णांपैकी दोघांना इतर आजार होते. तसेच त्यांचा वयोगट ७५ वर्षांपुढील होता. हा उपप्रकार धोकादायक नसून सौम्य असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी

राज्यात सिंधुदुर्गमध्ये जेएन.१ चा एकमेव रुग्ण सापडला आहे. त्याला कुठून संसर्ग झाला याची तपासणी केली जात आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी केली जात आहे. या रुग्णाची लक्षणे आणि इतर बाबींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. त्याचा अहवाल ४८ तासांत सरकारला मिळेल. हा अहवाल मिळाल्यानंतर हा उपप्रकार किती धोकादायक आहे, हे स्पष्ट होईल. सध्या करोनाचा संसर्ग वाढत असता तरी तो घातक स्वरुपाचा नाही, असे सावंत यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – मुंबई : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपली चिकित्सा योजना बंद पडण्याच्या मार्गावर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता सुट्यांचा काळ आहे. त्यामुळे अनेक जण पर्यटनस्थळी जाण्याचे नियोजन करीत आहेत. सहलीसाठी जाताना नागरिकांनी गर्दीत जाणे टाळावे. याचबरोबर सहव्याधी असलेल्या व्यक्तींनी गर्दीत शक्यतो मास्कचा वापर करावा. – तानाजी सावंत, आरोग्यमंत्री