लाेकसत्ता प्रतिनिधी

पुणे: अपंग मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पुणे जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाचे तत्कालीन अधिकारी डॉ. शिवाजी विधाते यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी चंद्रशीला पाटील यांनी बंडगार्डन पोलिसांना दिले.

याबाबत एका अपंग मुलीने तक्रार दिली होती. डॉ. विधाते यांनी मुलीला कामाबाबत चर्चा करण्यासाठी त्यांच्या कार्यालयात बोलविले आणि तिचा विनयभंग केला. ‘तुला कायमस्वरूपी वेतनश्रेणीवर घेतो’ असे सांगून डॉ. विधाते यांनी तिच्याकडे पैशांची मागणी केली होती. डाॅ. विधाते यांनी मुलीकडे शरीर सुखाची मागणी केल्याची तक्रार मुलीने बंडगार्डन पोलीस ठाण्यात केली होती.

हेही वाचा… पिंपरीत डोळे येण्याची साथ नियंत्रणात, पण साथीच्या आजारांनी शहरवासीय हैराण

बंडगार्डन पोलिसांनी संबंधित तक्रार पुणे जिल्हा परिषदेतील विशाखा समितीकडे पाठविली होती. याबाबतचा चौकशी अहवाल पोलिसांनी मागविला होता. मोबाइल संच हाताळताना डॉ. विधाते यांच्या हाताचा स्पर्श मुलीला झाला, असा अहवाल समितीने दिला होता. मात्र त्यानंतरही गुन्हा दाखल न झाल्याने मुलीने ॲड. तौसिफ शेख आणि ॲड. क्रांतीलाल सहाणे यांच्यामार्फत न्यायालयात खासगी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर या घटनेचे गांभीर्य विचारात घेऊन न्यायालयाने डॉ. विधाते यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून चौकशी करावी. चौकशीचा अहवाल तीन महिन्यांत सादर करावा, असे आदेश न्यायालयाने बंडगार्डन पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.