शनिवार वाड्यात नमाज पठणाचा व्हिडीओ समोर आल्याने पतित पावन संघटनेने मेधा कुलकर्णी यांच्या नेतृ्त्वात आंदोलन केलं आणि ज्या ठिकाणी नमाज पठण झालं त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण करण्यात आलं. शनिवार वाडा हे मराठा साम्राज्याचं प्रतीक आहे तिथे आम्ही असले प्रकार सहन करणार नाही असं म्हणत मेधा कुलकर्णींनी इशारा दिला आहे. यानंतर आता काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी पोस्ट लिहून मस्तानीही त्या वाड्यात राहिली होती. विधात्याचे नाव घेतलं तर पोटात का दुखलं? असा सवाल सचिन सावंत यांनी विचारला आहे.
खासदार मेधा कुलकर्णींनी पोस्ट केला व्हिडीओ
पुण्याचे वैभव – शनिवार वाडा ऐतिहासिक वारसा स्थळ की गैर हिंदू प्रार्थना स्थळ? सारसबाग येथे झालेल्या नमाज पठणाच्या घटनेनंतर शनिवार वाड्यात घडलेला प्रकार हा प्रत्येक पुणेकरासाठी चिंतेचा आणि संतापाचा विषय! पुणे प्रशासन नक्की करते काय? आपल्या वारसा स्थळांचा सन्मान कुठे हरवतोय? चला, आपण सर्वजण एकत्र येऊ आणि शिव वंदना करून आपल्या संस्कृतीचा सन्मान जपूया! अशी पोस्ट लिहून मेधा कुलकर्णी यांनी आंदोलन स्थळी जाऊन सदर कृतीचा निषेध केला आहे.
मेधा कुलकर्णी काय म्हणाल्या?
शनिवार वाड्यात जिथे आम्ही आलो आहोत याच ठिकाणी नमाज पठण करण्यात आलं. शनिवार वाडा हे ऐतिहासिक ठिकाण आहे. मराठा साम्राज्याचा विस्तार अटक ते कटक जो झाला तो ज्या केंद्रातून चालवला गेला ते ऐतिहासिक ठिकाण हे आमच्या विजयाचं प्रतीक आहे. मुघलांचा नाश या ठिकाणी झाला. तेच इथं येऊन नमाज पठण करत असतील तर आमचं त्यांना आवाहन आहे. तुम्ही ज्या नाईलाजास्तव हिंदू धर्म सोडून धर्मांतर केलं आहे तुम्ही पुन्हा हिंदू धर्मात परत या. त्याच धर्मात राहायचं असेल तर तुमच्या घरी किंवा मशिदीत नमाज पठण करा. सार्वजनिक ठिकाणी किंवा ऐतिहासिक ठिकाणी येऊन नमाज पठण करु नका. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं वागू नका. यापुढे आम्ही हे खपवून घेणार नाही. पतित पावन संघटना या ठिकाणी शुद्धीकरण करुन शिववंदना गाणार आहे. तसंच पूर्वी या ठिकाणी माघी गणेश उत्सव साजरा होत होता तो पुन्हा सुरु करावा अशी मागणी मी करते आहे असंही मेधा कुलकर्णी यांनी म्हटलं आहे.
सचिन सावंत यांची पोस्ट काय?
मुस्लिम महिलांनी शनिवार वाड्यात नमाज पठण केले म्हणून भाजपावाल्यांनी गोमूत्र शिंपडले हे पाहून कपाळावर हात मारायची वेळ आली. अरे बाबांनो त्या शनिवार वाड्यात मस्तानीही राहिली आहे. पेशव्यांच्या सरदारांनीच छत्रपतींचा जरीपटका काढून युनियन जॅक फडकावला होता. अशा ठिकाणी विधात्याचे नाव त्या महिलांनी घेतले तर यांच्या पोटात दुखायला लागले. तुम्हाला तीथे जप करत बसायला कोणी अडवले आहे का? समोर आणि बाजूला दर्गा आहे तो ही पेशवेकालीन! पेशव्यांना त्यांची अडचण नव्हती पण तुम्हाला असेल तर हवा त्या दर्ग्यांना शिवून येते म्हणून आपल्या नाकातही गोमूत्र घालणार का?
वाड्यातून काका मला वाचवा अशा आर्त हाका अजून ऐकायला येतात असे काही पुणेकर म्हणतात. त्यामुळे विधात्याचे नाव घेतले तर चांगलेच आहे की तुम्ही ही राम राम म्हणा! बरं त्या शनिवार वाड्यात इतकं काही घडून गेले आहे की भाजपावाल्यांनो तुमच्या समजेनुसार खरेतर सर्व वाडा गोमूत्राने धुवून काढला पाहिजे. त्यामुळे तुम्ही किती बुरसटलेल्या विचारांचे आहात हेही जनतेला कळेल.
