पुणे: शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने व्यावसायिकाची सायबर चोरट्यांनी ४३ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध आंबेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका व्यावसायिकाने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार व्यावासायिक कात्रज भागातील आंबेगाव खुर्द परिसरात राहायला आहे.

सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संदेश पाठविला होता. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून चोरट्यांनी त्यांना जाळ्यात ओढले. व्यावसायिकाने सुरुवातीला काही रक्कम गुंतविली. तेव्हा चोरट्यांनी त्यांना परतावा दिला. परतावा मिळाल्याने त्यांचा विश्वास बसला. त्यानंतर चोरट्यांनी त्यांना आणखी रक्कम गुंतविण्यास सांगितले. गेल्या चार ते पाच महिन्यांत त्यांनी वेळोवेळी ४३ लाख ५० हजार रुपये गुंतविले.

पैसे गुंतविल्यानंतर त्यांना परतावा मिळाला नाही. चोरट्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा चोरट्यांनी त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. चोरट्यांनी त्यांचे मोबाइल क्रमांक बंद केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन चोरमोले तपास करत आहेत.

ज्येष्ठाची १० लाखांची फसवणूक

बँक खाते हॅक करुन सायबर चोरट्यांनी ज्येष्ठाच्या खात्यातून नऊ लाख ९९ हजार ९९९ रुपये चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध सिंहगड रस्ता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका ज्येष्ठाने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार वडगाव बुद्रुक परिसरात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर काही दिवसांपूर्वी एक लिंक पाठविली होती. या लिंकमध्ये त्यांनी स्वत:ची माहिती भरली, तसेच त्यांनी बँक खात्याची गोपनीय माहिती लिंकमध्ये भरली. या माहितीचा गैरवापर करुन चोरट्यांनी त्यांचे खाते हॅक केले. त्यांच्या खात्यातून परस्पर ९ लाख ९९ हजार ९९९ रुपयांची रक्कम चोरट्यांनी खात्यात हस्तांतरित करुन घेतली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे तपास करत आहेत.