प्रेयसीवरील संशयावरुन एका तरुणाने तिच्या वरिष्ठाला जाब विचारल्याने दोघांमध्ये वाद झाला. वाद झाल्लामुळे तरुणीने आपल्या मामांना बोलावले. त्यांनी प्रियकराला मारहाण सुरू केली. ते पाहून त्याचा मित्र भांडणे सोडविण्यास गेला, तेव्हा त्यालाही मारहाण झाली आणि त्यात त्याला आपले प्राण गमवावे लागले.

ही घटना लोकमान्यनगर पोस्ट ऑफिससमोर शुक्रवारी रात्री पावणेबारा वाजता घडली. गणेश गायकवाड (वय २१, रा. दत्तवाडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.याप्रकरणी राहुल वाळंज (वय २२, रा. भुकूम, ता. मुळशी) याने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी तुकाराम दारवटकर, माऊली दारवटकर (रा. खैरेवाडी, गणेशखिंड रोड) यांच्यासह तरुणी व ४ ते ५ साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल याचे एका तरुणीबरोबर प्रेम संबंध आहेत. ही तरुणी जिथे काम करते, तेथील मॅनेजरबरोबर तिचे सूत जुळल्याचा राहुलला संशय होता. त्यामुळे तो त्यांचा पाठलाग करत असे. शुक्रवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास मॅनेजरने या तरुणीला लोकमान्यनगर येथील पोस्ट ऑफिससमोर मोटारसायकलवरुन सोडले. त्यानंतर राहुल याने पुढे जाऊन मॅनेजरला अडविले व तुझे तिचे काय आहे, अशी विचारणा केली. त्यावेळी त्यांनी आमच्यात काही नाही, असे सांगण्याचा प्रयत्न केला. ही तरुणीही तेच सांगण्याचा प्रयत्न करीत होती. त्यावरुन राहुल आणि मॅनेजर यांच्यात भांडणे सुरू झाली. तेव्हा या तरुणीने आपल्या मामांना फोन करुन बोलावून घेतले. तुकाराम दारवटकर, माऊली दारवटकर व इतर ४ ते ५ जण आले. त्यांनी राहुल याच्या पोटात तलवारीने वार केले. आपल्या मित्राला मारहाण होत असल्याचे पाहून गणेश मध्ये पडला. तेव्हा आरोपींनी गणेश याच्या मानेवर तलवारीने वार केले. गंभीर जखमी झालेल्या गणेश याचा जागीच मृत्यू झाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले असून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.