पिंपरी : ‘मैत्रिणीला का बोलला’ अशी विचारणा करत एका टोळक्याने तरुणावर हाताने व पट्ट्याने जबर मारहाण केली. ही घटना भोसरीतील सदगुरुनगर भागात घडली. दीपक राजेंद्र भंडारकर (वय ३२, रा. शांतीनगर, बौद्ध मंदिराजवळ, भोसरी), कृष्णा उर्फ केशव रावसाहेब मोरे (वय २९, रा. चक्रपाणी वसाहत, पांडवनगर, भोसरी) या दोघांना अटक केली असून त्यांच्या तीन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन प्रकाश गायकवाड (वय २५, रा. सदगुरुनगर, भोसरी) असे जखमी तरुणाचे नाव असून त्यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गायकवाड हे आपल्या मित्रासह गप्पा मारत थांबले असता आरोपी तिथे आले. त्यातील एका आरोपीने ‘तू माझ्या मैत्रीणीला काय बोललास’ असे म्हणत त्याच्यावर हल्ला केला. आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून फिर्यादीस पट्ट्याने डोक्यावर, डोळ्याजवळ आणि शरीरावर मारहाण केली. भोसरी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
मोटारीची दुचाकीला धडक; दोन अल्पवयीन मुले जखमी भरधाव वेगातील मोटारीने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोन अल्पवयीन मुले गंभीर जखमी झाली. मात्र अल्पवयीन मुलांचे पालक तक्रार देण्यास तयार नसल्याने पोलिसांनी स्वतः फिर्याद देत मोटार चालकाविरोधात गुन्हा दाखल केला. ही घटना तळेगाव चाकण रोडवर आंबी वारंगवाडी येथे घडली.
पोलीस उपनिरीक्षक अहमद कासीमसात्र मुल्ला (वय ३८) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने मोटार भरधाव वेगात चालवून वाहतूकीच्या नियमांकडे दुर्लक्ष केले. त्यात समोरून जाणाऱ्या दुचाकीस्वार अल्पवयीन मुलांना धडक दिली. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. तसेच दुचाकीचेही नुकसान झाले. अपघातात दोन्ही दुचाकीस्वार मुले अल्पवयीन असल्याने त्यांच्या पालकांनी फिर्याद देण्यास नकार दिला. मात्र त्यातील एका मुलाला रक्ताची उलटी झाल्याने अपघाताची तीव्रता लक्षात घेता पोलिसांनी स्वतःहून फिर्याद दाखल केली. तळेगाव दाभाडे पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
पिंपरीत कोयत्यासह तरुणास अटक
पिंपरीत कोयतासदृश लोखंडी हत्यारासह तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. सुरज महादेव गायकवाड (वय २८, रा. पत्राशेड, बीरो बॉईज चौक, नेहरुनगर, पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस अंमलदार भागवत अंकुश गायकवाड (वय २८) यांनी रविवारी याबाबत संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने कोणताही परवाना न घेता बेकायदेशीररीत्या २०० रुपये किंमतीचा लोखंडी कोयता बाळगला होता. आरोपीवर हत्यार बाळगल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संत तुकारामनगर पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
श्वानाला मारहाण; टेम्पो चालकावर गुन्हा दाखल
श्वानाला लाकडी दांडक्याने मारहाण केल्या प्रकरणी टेम्पो चालकावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना लक्ष्मी चौक, हिंजवडी येथे घडली. याबाबत पुण्यातील व्यक्तीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने रविवारी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास लाकडी दांडक्याने श्वानाला मारहाण करून गंभीर जखमी केले. हिंजवडी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
किरकोळ वादातून तरुणाला मारहाण; दोघांना अटक
मित्रांसोबत गप्पा मारत असलेल्या तरुणाला दोन जणांनी दगडाने मारहाण केल्याची घटना काळेवाडीतील पवना नगर भागात घडली.गौरव सुरेश होनमाने (वय २५, रा. पवना नगर, काळेवाडी) आणि आदेश चिंदू नढे (वय २८, रा. ज्ञानेश्वर मंगल कार्यालयाजवळ, काळेवाडी गावठाण) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अभय दिगंबर सोनकांबळे (वय २४, रा. प्रभुचा आशीर्वाद, विजय नगर, काळेवाडी, पुणे) यांनी रविवारी याबाबत काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आकाश आडसुळे, आदित्य बहिरट व फिर्यादीस शिवीगाळ करून भांडण केले. त्यात आरोपींनी आदित्य बहिरट याला दगडाने मारहाण केली. तसेच फिर्यादीलाही हाताने मारहाण केली. पुढील तपास काळेवाडी पोलीस करत आहेत.