वीज देयकांची थकबाकी असल्याने रात्री वीजपुरवठा खंडित करण्यात येणार असल्याचा बनावट संदेश पाठवून किंवा मोबाइलवर संपर्क साधून नागरिकांची फसवणूक करण्याच्या प्रकाराचे जाळे राज्यभर पसरले आहे. अनेक नागरिक या संदेशांना बळी पडत असून, त्याद्वारे नागरिकांची ऑनलाइन पद्धतीने आर्थिक फसवणूक केली जात आहे. नागरिकांना हे संदेश वैयक्तिक क्रमांकांवरून येत आहेत. मात्र, महावितरण कंपनीकडून कोणत्याही ग्राहकाला वैयक्तिक क्रमांकावरून संदेश पाठवलिले जात नाहीत किंवा त्याद्वारे पाठविलेला दुवा उघडण्यास संगितले जात नाही. त्यामुळे नागरिकांनी अशा संदेशांना प्रतिसाद देऊ नये, काही शंका असल्यास थेट महावितरणच्या कार्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहन केले जात आहे.
‘गेल्या महिन्यातील वीजबिल अपडेट नसल्याच्या कारणावरून आज रात्री ९.३० वाजता वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे,’ अशा आशयाचे बनावट संदेश नागरिकांना मोबाइलवर पाठविले जात आहेत. काही प्रकरणात मोबाइलवर थेट संपर्कही साधला जातो. वीज देयकांशी संबंध नसलेले नागरिक किंवा देयक भरलेल्या ग्राहकांनाही अशा प्रकारचे संदेश पाठविले जात आहेत. महावितरणकडून अशा प्रकारे वैयक्तिक क्रमांकावरून वीज तोडण्याचे संदेश पाठविणे किंवा संपर्क केला जात नाही. मात्र, त्याबाबत सावधगिरी न बाळगता त्यास प्रतिसाद दिल्यास केवळ ऑनलाइन वीज देयक भरण्यास सांगितले जाते. संबंधित वैयक्तिक क्रमांकावरून एखादा दुवा पाठवून तो उघडण्यास सांगितले जाते. नागरिकांनी तसे केल्यास त्यांच्या बँक खात्यातून परस्पर पैसे काढून घेतले जातात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>पुणे: सेवा रस्त्यांवरील अतिक्रमणे काढा; ‘एनएचएआय’च्या सूचना

राज्याच्या सर्वच भागांमध्ये अनेक नागरिकांना या संदेशांचा अनुभव येत आहे. त्याला प्रतिसाद दिल्यामुळे काहींची मोठी आर्थिक फसवणूकही झाली आहे. नागरिकांकडून वैयक्तिपणे आणि महावितरणकडूनही याबाबत पोलिसांच्या सायबर विभागाकडे तक्रारी देण्यात आल्या आहेत.नागरिकांनी याबाबत दक्षता घ्यावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.

महावितरण संदेश कसे पाठविते?
महावितरणकडून वैयक्तिक मोबाइलवरून ‘एसएमएस’ किंवा ‘व्हॉटस् ॲप’ संदेश पाठविण्यात येत नाही. ग्राहक क्रमांकासोबत मोबाइल क्रमांकाची नोंदणी केलेल्या ग्राहकांना संगणकीय प्रणालीद्वारे ‘एसएमएस’ पाठविण्यात येतात. या संदेशांचे सेंडर आयडी VM-MSEDCL, VK-MSEDCL, AM-MSEDCL, JM-MSEDCL असे आहेत. या अधिकृत संदेशाद्वारे वीजग्राहकांना कोणत्याही वैयक्तिक मोबाइल क्रमांकावर संपर्क साधण्याबाबत कळविले जात नाही. बँकेचा ओटीपी कळविणे किंवा कोणत्याही प्रकारचे दुवा उघडण्यास सांगितले जात नाही. महावितरण सेंडर आयडीच्या संदेशांमध्ये वीजपुरवठा खंडित झाल्यास तो पूर्ववत होण्यास लागणारा संभाव्य कालावधी, दरमहा वीजबिलांची रक्कम, स्वत:हून मीटर रिडींग पाठविण्याचे ग्राहकांना आवाहन, मीटर वाचनाचा तपशील आणि वीजपुरवठा खंडित करण्याची रीतसर नोटीस आदींची माहिती पाठविण्यात येते.

हेही वाचा >>>पुणे: लठ्ठपणावरील शस्त्रक्रियेनंतर तो धावला मॅरेथॉन!

शंका आल्यास काय कराल?
वीज देयकांचा सुरक्षित भरणा करण्यासाठी ग्राहकांसाठी महावितरणचे मोबाइल ॲप किंवा http://www.mahadiscom.in या संकेतस्थळाचा वापर करावा. वैयक्तिक क्रमांकावरील कोणताही संदेश, संपर्काला प्रतिसाद देऊ नये. काही शंका किंवा तक्रारी असल्यास वीजग्राहकांनी चोवीस तास सुरू असलेल्या १९१२, १८००२१२३४३५ किंवा १८००२३३३४३५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा किंवा नजीकच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A network of fake power cut messages across the state pune print news amy
First published on: 24-11-2022 at 12:20 IST