पुणे : मेफेड्रोन प्रकरणाची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) माहिती घेतल्यानंतर आता सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) करण्यात येणार आहे. मेफेड्रोन विक्रीतून मिळालेले कोट्यवधी रुपये हवालामार्फत पाठविण्यात आले असल्याने ‘ईडी’कडून मेफेड्रोन तस्करी, तसेच उत्पादन प्रकरणाची माहिती घेतली जाणार असून, याबाबत ‘ईडी’ने पुणे पोलिसांशी पत्रव्यवहार केला आहे.

पुणे पोलिसांनी पुणे, सोलापूर महामार्गावरील कुरकुंभ औद्योगिक वसाहत, सांगली, दिल्लीत छापे टाकून तीन हजार ७०० कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले. अमली पदार्थ तस्करी प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत आठ जणांना अटक केली आहे. कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील अर्थकेम लॅबोरटरीजचे मालक भीमाजी परशुराम साबळे (वय ४६, रा. पिंपळे सौदागर, मूळ रा. श्रीगोंदा, जि. अहमदनगर), रासायनिक अभियंता युवराज बब्रुवान भुजबळ (वय ४१, रा. मरिबाचा वाडा, डोंबिवली) यांना अटक करण्यात आली. मेफेड्रोन तस्करी प्रकरणाचा मुख्य सूत्रधार संदीप धुनिया पसार झाला आहे. तो नेपाळमार्गे कुवेतला पसार झाल्याची माहिती तपासात मिळाली आहे. या प्रकरणातील अटक करण्यात आलेला आरोपी हैदर शेखने मेफेड्रोन विक्रीतून मिळालेले कोट्यवधी रुपये हवालामार्फत दिल्लीत पाठविल्याची माहिती तपासात मिळाली.

हेही वाचा >>>मोठी बातमी : प्राणिसंग्रहालयातून पसार झालेला बिबट्याचा अखेर जेरबंद

मेफेड्रोन विक्री, उत्पादन, तस्करीची माहिती नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) घेतली होती. त्यानंतर आता ईडीने पुणे पोलिसांशी पत्रव्यवहार केला आहे. अमली पदार्थ तस्करीची माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांनी पुणे पोलिसांकडून मागविली आहे. मेफेड्रोन विक्रीतून मिळालेले कोट्यवधी रुपये हवालामार्फत पाठविण्यात आले असून, ईडीकडून आर्थिक व्यवहारांची माहिती घेण्यासाठी समांतर तपास करण्यात येेणार आहे.

प्रेयसीला बिहारमध्ये पकडले

मेफेड्रोन तस्करी प्रकरणात मुख्य सूत्रधार संदीप धुनिया नेपाळमार्गे कुवेतला पसार झाल्याचे उघडकीस आले आहे. त्याची प्रेयसी सोनमकुमारी पंडित हिला पुणे पोलिसांच्या पथकाने बिहारमधील पूर्णियातून ताब्यात घेतले. धुनियाने तिच्या नावाने सीमकार्ड घेतले होते. तिने त्याला मदत केल्याचा संशय आहे. धुनिया आणि सोनमकुमारी यांनी पुण्यात भाडेतत्त्वावर सदनिका घेतल्याची माहिती तपासात मिळाली आहे.