लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: बेकायदा सावकारी करणाऱ्याच्या त्रासामुळे एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सिंहगड रस्त्यावरील किरकिटवाडी भागात घडली. याप्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निलेश जंगम (रा. किरकिटवाडी, सिंहगड रस्ता) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी बेकायदा सावकारी करणारा आराेपी सुहास दांडेकर, गोविंद मारुती भोपळे, वर्षा गोविंद भोपळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत निलेश जंगम यांच्या पत्नीने हवेली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी जंगम यांनी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांनी जप्त केले आहे. जंगम यांचे मित्र गोविंद भोपळे याने एकत्रित व्यवसाय सुरू करू, असे सांगितले होते. भोपळे याने जंगम यांच्या नावाने बेकायदा सावकारी करणारा आरोपी दांडेकर याच्याकडून साडेतीन लाख रुपये व्याजाने घेतले होते.

हेही वाचा… केंद्र सरकार रशियातून गहू आयात करणार? महागाई आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भोपळे याने व्यवसाय सुरू न करता व्याजाने घेतलेले पैसे खर्च केले. जंगम यांनी पैसे परत करण्याची मागणी केली. तेव्हा भोपळे आणि त्याच्या पत्नीने टाळाटाळ केली. दांडेकर याने व्याजासाठी त्रास देण्यास सुरुवात केली. पतीला शिवीगाळ करुन दमदाटी करण्यात आली. दांडेकरच्या त्रासामुळे पतीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली, असे जंगम यांच्या पत्नीने हवेली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. हवेली पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अनमोल मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शीतल ठेंबे तपास करत आहेत.