पुणे: सराईत गुन्हेगाराला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर पाळीव श्वान सोडण्यात आल्याची घटना मुळशीतील रिहे गावात घडली. या प्रकरणी त्या सराईत गुन्हेगाराला पौड पोलिसांनी अटक केली.

मंगेश पालवे (वय ३२, रा. रिहे, ता. मुळशी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. पवळेविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, बेकायदा शस्त्र बाळगणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली होती. मोक्का कारवाई केल्यानंतर तो येरवडा कारागृहात होता. त्याला न्यायालयाने नुकताच जामीन मंजूर केला आहे, अशी माहिती पौड पोलिसांनी दिली. शनिवारी पालवेने रिहे गावात एकाला पिस्तुलाचा धाक दाखवून त्याच्याकडील ११ हजारांची रोकड लुटली होती. याबाबतची माहिती पौड पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक रिहे गावात पोहोचले. पोलिसांना पाहताच पालवेने त्याचे पाळीव श्वान पोलिसांच्या अंगावर सोडले. श्वान पोलिसांच्या अंगावर धावून गेल्याने पोलिसांना त्याला ताब्यात घेता आले नाही.

हेही वाचा… मावळमध्ये खासदारकीसाठी महायुतीमध्ये तीन पायांची शर्यत, आता बाळा भेगडेंचे भावी खासदार म्हणून लागले फ्लेक्स

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानंतर पालवेने घरात जाऊन खिडकीतील काचेने स्वत:वर वार केले. बिअरची बाटली डोक्यात फोडून आत्महत्येचा प्रयत्न केला. पालवेच्या श्वानाला पकडण्यासाठी पोलिसांनी वन विभागाला माहिती दिली. पोलिसांनी पालवेला शरण येण्याचे आवाहन केले. शरण न आल्यास गोळीबार करण्याचा इशारा पोलिसांनी दिला. त्यानंतर पालवे पोलिसांना शरण आला. पालवेला अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्याला २७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पालवेने शनिवारी रात्री रिहे गावात आणखी एकाला धमकावून लुटल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्याच्याविरुद्ध पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत.