पुण्यातील सदाशिव पेठेतील सकाऊड ग्राऊंड परिसरातील हैदराबादी बिर्याणी हॉटेलमध्ये लागलेल्या आगीत ६ वर्षीय मुलीचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.ईक्रा नईम खान असे मृत मुलीचे नाव आहे. भिकारदास मारुती मंदिराजवळ पत्राचे बांधकाम असलेल्या छोट्या हॉटेलमध्ये पावणे अकरा वाजण्याचे सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. त्यानंतर हॉटेलमध्ये धावपळ उडाली. यादरम्यान हॉटेलमधील पोट माळ्यावर संबंधित सहा वर्षाची मुलगी ही झोपलेली होती. आगीची घटना घडल्यानंतर तिच्या आई-वडिलांनी दोन मुलांना तातडीने उचलून हॉटेल बाहेर आणले. त्यानंतर मुलीला आणण्यासाठी ते जात असताना आगीने रौद्र रूप धारण केले. त्यामुळे त्यांना हॉटेलमध्ये जाणे शक्य झाले नाही.

हेही वाचा : पुणे वाहतूक पोलिसांच्या कामकाजावर पोलीस आयुक्तांचा ‘अंकुश’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या तीन गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या.अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीत अडकलेल्या सहा वर्षांच्या मुलीला पाच मिनिटातच बाहेर काढण्यासाठी अथक प्रयत्न करत आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्या मुलीला अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढून तातडीने जखमी अवस्थेत देवदूत या वाहनातून सूर्या हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र, उपचारादरम्यान मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. याबाबत खडक पोलीस पुढील तपास करत आहे. आग कशामुळे लागली, हे अद्याप स्पष्ट झालेले नसून या संदर्भात माहिती घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.