बांधकाम प्रकल्पात खोदलेल्या खड्ड्यातील खडक फोडण्यासाठी लावण्यात आलेल्या सुरुंगाचा स्फोट होऊन दगड लागल्याने बांधकाम मजूर तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना खराडी भागात घडली. स्फोटात एक बांधकाम मजूर जखमी झाला. या प्रकरणी तिघांविरोधात चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

कादीर रेमन शेख (वय २३, सध्या रा. लेबर कॅम्प, खराडी) असे मृत्युमुखी पडलेल्या बांधकाम मजुराचे नाव आहे. स्फोटात उडालेला दगड लागून नरेश मनुचौधरी याचा हात फ्रॅक्चर झाला आहे. निष्काळजीपणे स्फोटके उडविल्याप्रकरणी सचिन दिलीप आटपाडकर (वय ३८), गौतम मंडल (वय ३६), दीप मार्सकोले (वय २३, तिघे रा. घोटावडे, ता. मुळशी, जि. पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक गोरक्ष घोडके यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा – “:…म्हणून कसबा पोटनिवडणुकीत भाजपचं ओबीसी समीकरण”, रोहित पवारांचा टोला

हेही वाचा – “वडिलांची उणीव भासते आहे”, लक्ष्मण जगताप यांच्या कन्येचे भावनिक आवाहन; म्हणाल्या, “ज्या प्रमाणे वडिलांवर..”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खराडी भागात प्लॅनेज कन्स्ट्रक्शन प्रा. लि. कडून बांधकाम प्रकल्पाचे काम करण्यात येत आहे. खोदलेल्या खड्ड्यात सुरुंग लावण्यात आला. सुरुंगाचा स्फोट‌ झाल्यानंतर खड्ड्यातील दगड उडाले. एक दगड बांधकाम मजूर शेख याच्या डोक्याला लागला. तेथे काम करणारा मजूर मनुचौधरीच्या हातावर दगड लागला. गंभीर जखमी झालेल्या शेख याचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला. ठेकेदाराच्या बेजबाबदारपणा, तसेच बांधकाम मजुरांना सुरक्षाविषयक साहित्य न पुरवल्याने दुर्घटना घडल्याचे पोलिसांनी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक खांडेकर तपास करत आहेत.