पुणे: बिबवेवाडी-स्वारगेट रस्त्याने पायी चालणाऱ्या एका ५५ वर्षीय महिलेच्या गळ्यातील ९९ हजार रुपये किमतीची सोनसाखळी जबरदस्तीने हिसकावून चोरटे पसार झाले.
चोरट्यांनी हिसका दिल्यानंतर महिला खाली पडली, पण थोडक्यात बचावली. हा प्रकार मंगळवारी (१३ मे) रात्री दहाच्या सुमारास घडला. संबंधित महिलेने पर्वती पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार दुचाकीवरील दोन चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला शिवदर्शन परिसरात राहण्यास आहेत. त्या मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास बिबवेवाडी-स्वारगेट रस्त्याने घराकडे पायी चालत जात होत्या. त्या वेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी आपली गाडी त्यांच्याजवळ घेतली.
वाहनावर पाठीमागे बसलेल्या चोरट्याने बळाचा वापर करून त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी जबरदस्तीने हिसकावली. अचानक झालेल्या या प्रकाराने महिला घाबरली. जोराचा हिसका बसल्याने महिला खाली कोसळली. चोरट्यांनी हिसका मारून सोनसाखळी चोरून तेथून पळ काढला. महिलेने आरडाओरडा केला. परंतु, चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले.