पुणे : राष्ट्रपती, पंतप्रधानपदांपासून ग्रामपंचायतीपर्यंत सर्वच निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरणारे ‘बिगबॉस फेम अभिजित बिचकुले यांनी कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज सादर केला. अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार बिचकुले कुटुंबीयांची चार लाख सात हजार रुपये संपत्तीचे मालक असल्याचे समोर आले आहे.

कसबा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्यास मंगळवारपर्यंत मुदत होती. शेवटच्या दिवशी बिचकुले यांनी उमेदवारी अर्ज सादर केला. दरम्यान, बिचकुले यांनी शिवाजी विद्यापीठातून बी.ए. अॉनर्स ही पदवी संपादन केली आहे. बिचकुले यांच्यावर कोणत्याही प्रकारचे कर्ज नाही. बिचकुले यांच्याकडे वारसाप्राप्त कोणत्याही प्रकारची मालमत्ता नाही. त्यांची जंगम मालमत्ता ६३ हजार ६०० रुपये, तर पत्नीची तीन लाख ३६ हजार ३०१ रुपये एवढी आहे. बिचकुले यांनी पत्नीचे सन २०१९-२० चे वार्षिक उत्पन्न ६९ हजार ३६० रुपये एवढे दाखविले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बिचकुले यांच्यावर दोन खटले प्रलंबित आहेत. प्रतिज्ञापत्रात बिचकुले यांनी स्वतः कवी आणि कलाकार असल्याचे नमूद केले असून उत्पन्नाचा स्त्रोत कला क्षेत्रातून असे नमूद केले आहे, तर त्यांची पत्नी एलआयसी एजंट आहे. बिचकुले यांच्याकडे आणि त्यांच्या पत्नीकडे प्रत्येकी रोख रक्कम २० हजार रुपये आहे. बिचकुले यांची बँकेतील ठेव रक्कम ६३ हजार ६०० रुपये, तर पत्नीची चार लाख ४२ हजार ८१७ रुपये आहे. मुलाच्या नावे सात हजार २७४, तर मुलीच्या नावे ६७ हजार २४८ रुपये आहेत, असे बिचकुले यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.