पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) आज मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास छापा टाकला. लिपिकाला ताब्यात घेवून चौकशी सुरु केल्याची माहिती मिळाली आहे. पाणीपुरवठा विभागाच्या वरिष्ठ अधिका-याचीही चौकशी सुरु असल्याचे समजते.
मार्चअखेर असल्यामुळे महापालिकेत ठेकेदारांची बीले काढण्यासाठी धावपळ सुरु आहे. महापालिकेच्या लेखा विभागात बिले सादर करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून ठेकेदारांची लगबग सुरू आहे. त्यापार्श्वभूमीवर पाणीपुरवठा विभागात आज दुपारी एसीबीच्या पथकाने टाकलेल्या छापामुळे एकच खळबळ उडाली आहे.
आणखी वाचा- सावधान! डिजिटल व्यवहारांवर सायबर गुन्हेगारांचा डोळा, रिझर्व्ह बँकेच्या माहितीतून वास्तव समोर
एका लिपिकाला ताब्यात घेतले असून या विभागाच्या वरिष्ठ अधिका-याचीही बंद दाराआड चौकशी सुरु आहे. पैसे घेण्यात या दोघांचाही समावेश आहे का, याची चौकशी सुरु असल्याचे सूत्रांनी सांगितले. महापालिकेतील तिस-या मजल्यावर प्रशासक तथा आयुक्त शेखर सिंह यांची स्थायी समितीची सभा सुरु झाली होती. त्याचवेळी एसीबीने छापा टाकला. स्थायी समितीच्या बैठकीत बसलेल्या पाणीपुरवठा विभागाच्या वरिष्ठ अधिका-याला बैठकीतून बोलावून घेतले. बंद दाराआड चौकशी सुरु केली आहे.