मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर एका पेट्रोलच्या टँकरला भीषण अपघात झाला असून टँकरने पेट घेतल्याने काही काळ या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. सध्यावाहतूक संथ गतीने सुरु असल्याने प्रवाशांना आणि वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. रसायनी जवळच्या भोकरपाडा येथे सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. त्याचबरोबर द्रुतगती महामार्गावरील अमृतांजन पुलाखाली एक कंटेनर उलटल्याने काही काळ वाहतुक ठप्प झाली होती. मात्र, पोलीस आणि आयआरबीच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने हा टँकर मार्गावरून हालवण्यात आला असून वाहतूक सुरळीत झाली आहे.
वाहतूक कोंडीमुळे पर्यायी मार्ग म्हणून जुन्या महामार्गावरची वाहतूक सावलामार्गे वळविण्यात आली आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भरधाव वेगामुळे अनेकदा अपघाताच्या घटना घडत असतात. जुना महामार्ग हा तुलनेत अरूंद असल्याने एखादा मोठा अपघात या मार्गावर घडल्यास वाहतुक कोंडीचा मोठा प्रश्न निर्माण होतो.
गेल्या आठवड्यात पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर टोयोटा इनोवा कारचा अपघात झाला होता. यात कारमधील एकाचा जागीच मृत्यू झाला होता तर तीन जण जखमी झाले होते. अपघातातील सर्वजण बीडचे रहिवासी होते. कारच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला होता. त्यामुळे गाडी रस्त्याच्या खालच्या बाजूला उतरली. त्यानंतर ही कार रस्त्याच्याकडेला असणाऱ्या झाडांना धडकून खोल नाल्यात कोसळली होती.