scorecardresearch

देवदर्शन आटोपून येत असताना पुणे-नगर महामार्गावरील अपघातात शिरुरमधील चारजणांचा मृत्यू; सात जखमी

दुर्घटनेत राजेंद्र विष्णू साळवे (वय ३२) मयूर संतोष साळवे (वय २२), विजय राजेंद्र अवचिते (वय २४) व धीरज अजित मोहिते (वय १०) हे मृत्यूमुखी पडले. त्यातील विजय अवचिते व धीरज मोहिते हे मामा-भाचे आहेत.

Accident on Pune Nagar Highway
पुणे : देवदर्शन आटोपून येत असताना पुणे-नगर महामार्गावर अपघात (प्रातिनिधिक छायाचित्र)

शिरूर : देवदर्शन आटोपून घरी परतत असताना पुणे-नगर महामार्गावर कामरगाव येथे झालेल्या अपघातात शिरुरमधील आमदाबाद येथील चार भाविकांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमुळे आमदाबाद परिसरावर शोककळा पसरली असून, या चारही जणांवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या अपघातात सातजण जखमी झाले आहेत. दुर्घटनेत राजेंद्र विष्णू साळवे (वय ३२) मयूर संतोष साळवे (वय २२), विजय राजेंद्र अवचिते (वय २४) व धीरज अजित मोहिते (वय १०) हे मृत्यूमुखी पडले. त्यातील विजय अवचिते व धीरज मोहिते हे मामा-भाचे आहेत.

अपघातात जखमी झालेल्यांमध्ये आमदाबादचे माजी सरपंच पोपटराव घुले, खंडू काशिनाथ नरवडे, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप भाऊसाहेब साळवे, बापू शिवाजी साळवे, गुरुनाथ रावसाहेब साळवे, अजित रावसाहेब साळवे, अक्षय किसन साळवे आदींचा समावेश आहे. आमदाबाद येथील काही भाविक छोट्या टेम्पोमधून पाडव्याच्या दुपारी देवदर्शनासाठी शनीशिंगणापूर, देवगड या ठिकाणी गेले होते. या ठिकाणचे देवदर्शन झाल्यावर रात्री घरी परतत असताना पुणे-नगर महामार्गावर कामरगावजवळ पुणे बाजूकडून नगरच्या दिशेने जात असलेला ट्रक रस्तादुभाजक तोडून छोट्या टेप्मोला धडकला. त्याचवेळी नगरहून पुण्याचा दिशेने चाललेल्या कंटेनरने अपघातग्रस्त ट्रकला धडक दिली. या धडकेत टेम्पोमधील चारजण मरण पावले.

हेही वाचा – पिंपरी-चिंचवड : “राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली महानगरपालिकेतील कारभार”, शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांचा आरोप

मृत्युमुखी पडलेले राजेंद्र साळवे हे एमआयडीसीत कंपनीत कामाला होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी व एक मुलगा असा परिवार आहे. विजय अवचिते हे शिरूर येथे टायपिंगचे काम करायचे. त्यांच्या पश्चात आई-वडील व पत्नी असा परिवार आहे. मयूर साळवे हा वाजंत्री कलाकार होता. धीरज मोहिते हा चिंचोली मोराची येथील असून तो त्याचा मामा विजय अवचिते यांच्याकडे राहायला होता. मृत पावलेले चारहीजण एकमेकांचे जवळचे नातेवाईक आहेत. चारही मृतदेह गावात आणल्यानंतर ते पाहून नातेवाईकांसह गावकऱ्यांना अश्रू अनावर झाले. या दुर्घटनेमुळे सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते.

हेही वाचा – मिरची झाली ‘चिखट’; मिरचीच्या दरामध्ये ५० वर्षांतील उच्चांकी भाववाढ

हृदय पिळवटून टाकणारा शोक

घरातील तरुण कर्ती व्यक्ती गेल्याने सर्वस्व गमावल्याच्या भावनेने कुटुंबीय शोक करीत होते. संपूर्ण गाव या ठिकाणी उपस्थित होता. चौघांचे मृतदेह पाहून आठवणींनी अनेकांच्या डोळ्यांतून पाणी वाहत होते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-03-2023 at 21:05 IST

संबंधित बातम्या