येरवडा भागात दहशत माजविणाऱ्या गुंडाच्या विरोधात पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्याचे आदेश दिले. गुंडाला वर्षभरासाठी ओैरंगाबादमधील कारागृहात स्थानबद्ध करण्यात येणार आहे.
निहाल विशाल भाट (वय २३, रा. भाटनगर, येरवडा) असे कारवाई केलेल्या गुंडाचे नाव आहे. भाट सराइत असून त्याच्या विरोधात खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत करणे, अपहरण, विनयभंग, बेकायदा शस्त्र बाळगणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. भाट याच्या दहशतीमुळे नागरिक त्याच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार देत नव्हते. त्याच्या विरोधात कारवाई करण्याचा प्रस्ताव येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे तसेच गुन्हे प्रतिबंधक शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे यांनी तयार केला होता.
पोलीस आयुक्त गुप्ता यांच्याकडे संबधित प्रस्ताव पाठविण्यात आला. पोलीस आयुक्तांनी प्रस्तावास मंजुरी देऊन भाट याला वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. भाट याची ओैरंगाबादमधील कारागृहात रवानगी करण्यात आली. आतापर्यंत शहरातील ७३ गुंडांच्या विरोधात पोलीस आयुक्तांनी झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई केली असून कारवाईमुळे गुंडांना जरब बसली आहे.