पुणे : चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीसाठी रविवारी (२६ फेब्रुवारी) मतदान होणार आहे. प्रचाराची सांगता शुक्रवारी (२४ फेब्रुवारी) सायंकाळी सहा वाजता होणार आहे. यानंतर होणाऱ्या छुप्या प्रचारावर प्रशासनाचे बारीक लक्ष असणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने लागू केलेल्या मार्गदर्शक सूचनांची प्रशासनाकडून काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे. आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती, संघटना तसेच राजकीय पक्षांवर कडक कारवाई करण्याचा इशारा कसबा, चिंचवड निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाने दिला आहे.

मतदान बंद होण्याच्या ४८ तास आधी प्रचार बंद करण्यात येतो. त्यानंतर मतदारसंघाबाहेरून आलेले आणि त्या मतदारसंघाचे मतदार नसलेले राजकीय नेते इत्यादींनी त्या मतदार संघात उपस्थित राहू नये. अशा नेत्यांनी प्रचाराचा कालावधी समाप्त होताच तो मतदार संघ सोडावा. त्या मतदारसंघाचे मतदार नसले, तरी सुद्धा उमेदवार किंवा त्याचा निवडणूक प्रतिनिधी यांना ही बाब लागू होणार नाही. केवळ निवडणुकीच्या कालावधीत राज्याच्या प्रभारी असलेल्या पदाधिकाऱ्याच्या बाबतीत अशा निर्बंधाचा आग्रह धरला जात नाही.

हेही वाचा >>> मतदान केंद्राच्या शंभर मीटर अतंरातील दुकाने, टपऱ्या रविवारी बंद ठेवण्याचे आदेश

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

असा पदाधिकारी राज्य मुख्यालयातील आपले राहण्याचे ठिकाण घोषित करेल आणि प्रस्तुत कालावधीतील त्याची ये-जा ही सामान्यपणे त्याचे पक्ष कार्यालय आणि त्याचे राहण्याचे ठिकाण यापुरतीच मर्यादित राहील. उमेदवारास शुक्रवारी सायंकाळनंतर ४८ तासाच्या कालावधीत कोणत्याही जाहीर सभा आणि मिरवणुका आयोजित करता येणार नाहीत. तसेच मतदान संपेपर्यंत प्रसारमाध्यमांना जनमत चाचणी प्रसारित करण्यास प्रतिबंध आहे. कोणत्याही जाहिराती किंवा प्रायोजित कार्यक्रम किंवा उमेदवाराला पाठिंबा देणारे किंवा टीका करणारे कोणतेही अहवाल निवडणुकीच्या निकालांवर प्रभाव टाकणारे किंवा प्रभावित करणारे कोणतेही अहवाल प्रतिबंधित आहेत. प्रचारासाठी लावण्यात आलेले फ्लेक्स, झेंडे, जाहिराती संबंधित उमेदवाराने काढून घ्यावेत, तसेच कोणत्याही प्रकारे वाहनांद्वारे प्रचार करण्यास प्रतिबंध आहे. याबाबत पाहणी करून योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना आचारसंहिता कक्षाला देण्यात आल्या आहेत, असे चिंचवडचे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी स्पष्ट केले.