पुणे : समाज कल्याण आयुक्तालयामार्फत सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी शासकीय वसतिगृहातील प्रवेशासाठीचे वेळापत्रक जाहीर करण्यात करण्यात आले आहे. त्यानुसार शालेय आणि अकरावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना वसतिगृह प्रवेशासाठी १७ जुलैपर्यंत, तर बिगरव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना २१ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे.
समाजकल्याणचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे या बाबतची माहिती दिली. शासकीय वसतिगृहासाठीची प्रवेशप्रक्रिया https://hmas.mahait.org संकेतस्थळाद्वारे ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाअंतर्गत जिल्ह्यात १४ मुलांची व १० मुलींची अशी मागासवर्गीय मुलां-मुलींची २४ शासकीय वसतिगृहे आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण १२ शासकीय वसतिगृहांपैकी आठ मुलांची, तर चार मुलींची वसतिगृहे आहेत. तालुकास्तरावरही १२ शासकीय वसतिगृहे आहे.
वसतिगृह प्रवेशासाठी शालेय, अकरावी, बारावीच्या विद्यार्थ्यांनी १७ जुलैपर्यंत अर्ज केल्यानंतर २१ जुलै रोजी प्रवेशाबाबतची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तर येईल. बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी २१ जुलैपर्यंत अर्ज केल्यावर २५ जुलै रोजी प्रवेशाबाबत अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यामुळे प्रवेशासाठी इच्छुक पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मागासवर्गीय मुला-मुलींची शिक्षणाची सोय व्हावी, त्यांना उच्च शिक्षण घेता यावे त्याचप्रमाणे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना विद्यालयीन व महाविद्यालयीन शिक्षण घेता यावे, यासाठी शासकीय वसतिगृहे सुरु करण्यात आली आहेत. शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात शासकीय, खासगी अशा अनेक शिक्षण संस्था, विद्यापीठे, महाविद्यालये आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यांतून विद्यार्थी शिक्षणासाठी पुण्यात येतात.
मात्र, सर्वच विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षण संस्थेच्या वसतिगृहात संधी मिळत नाही किंवा स्वतःची सोय करणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसते. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहाचा पर्याय उपयुक्त ठरू शकतो. शासकीय वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया आता ऑनलाइन पद्धतीने राबवली जाणार नसल्याने विद्यार्थ्यांना घरबसल्या अर्ज करण्याची संधी निर्माण झाली आहे. प्रवेशित विद्यार्थ्यांना सरकारकडून शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता अशा सुविधाही उपलब्ध करून दिल्या जातात.