‘लोकसत्ता अर्थब्रह्म’ कार्यक्रमात मान्यवरांचा सल्ला
पुणे : सध्याच्या काळात गुंतवणूक करताना ‘परतावा थोडा आणि जोखीम फार’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे गुंतवणूक करताना जोखीम व्यवस्थापन करणे गरजेचे आहे, असा सल्ला ‘लोकसत्ता अर्थब्रह्म’ कार्यक्रमातील मान्यवरांनी शुक्रवारी दिला.
‘लोकसत्ता अर्थब्रह्म’ या वार्षिकांकाच्या प्रकाशनानिमित्त आयोजित कार्यक्रमात गुंतवणुकीबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंड प्रस्तुत या कार्यक्रमात वसंत माधव कुळकर्णी यांनी ‘गुंतवणुकीत समभाग का हवेत?, श्रीकांत कुवळेकर यांनी ‘गुंतवणुकीचे जोखीम व्यवस्थापन’, करसल्लागार चिंतामणी देशपांडे यांनी ‘गुंतवणुकीतून कर नियोजन’ या विषयावर संवाद साधला. आदित्य बिर्ला ग्रुपच्या गुंतवणूक सल्ला केंद्राचे प्रमुख शैलेंद्र दीक्षित यांनी मनोगत व्यक्त केले. विजया ग्रुप आणि फाइव्हब्रिक रिअॅल्टी प्रा. लि. या कार्यक्रमाचे पॉवर्ड बाय पार्टनर, तर अपना सहकारी बँक लि. बँकिंग पार्टनर होते. विजया ग्रुपचे जयप्रकाश आणि फाइव्हब्रिक रिअॅल्टी प्रा. लि. चे राम राठोड यांनी वक्तयांचे स्वागत केले.
कुळकर्णी म्हणाले,की दीर्घायुष्य आणि महागाई हे वित्तीय नियोजनाचे प्रमुख शत्रू आहेत. व्याजाचे दर हे नेहमी महागाईच्या दरापेक्षा कमी असतात. गुंतवणूक करताना गुंतवणुकीचे उद्दिष्ट, कालावधी, गुंतवणूकदाराचे वय, त्याच्याजवळ असलेला निधी आणि भविष्यात आवश्यक उत्पन्न या गोष्टी ध्यानात घेतल्या पाहिजेत. समभागामध्ये गुंतवणूक करण्यासाठी वेळ नाही अशा लोकांनी म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करावी.
देशपांडे म्हणाले,‘ कर वाचविण्यासाठी बहुतांश लोक जीवन विम्यामध्ये गुंतवणूक करून प्राप्तिकरामध्ये त्याची वजावट घेतात. मात्र, जीवन विम्याची मुदत संपल्यानंतर मिळणारी रक्कम करपात्र असते हेच अनेकांना ठाऊक नसते. निर्वाह निधीमध्ये केलेल्या गुंतवणुकीवरचे व्याज करमुक्त असते. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रातील गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याजाच्या रकमेची पुनर्गुतवणूक केली तर ते करमुक्त होते. एकेकाळी पोस्टातील गुंतवणूक सुरक्षित मानली जात होती. मात्र, व्याजाचे दर कमी झाल्यामुळे लोकांचा पोस्टात पैसे ठेवण्यासंबंधी रस कमी झाला.’
कुवळेकर म्हणाले,की गुंतवणुकीची किंमत कमी होणे ही एक प्रकारची जोखीम असते. त्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करताना निफ्टी कंपन्यांची निवड करावी. कमॉडिटी बाजारामध्ये सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक केली जाते. आता कमॉडिटी बाजारामध्ये म्युच्युअल फंडाचाही प्रवेश झाला आहे.
दीक्षित म्हणाले,‘ अन्न-धान्य, आरोग्य सेवा आणि मुलांचे शिक्षण या खर्चामध्ये वाढ होत असल्याने प्रत्येकाने गुंतवणूक करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करताना घरातील महिलांचा सल्ला घेतला पाहिजे.’
‘लोकसत्ता’चे सहायक संपादक मुकुंद संगोराम यांनी प्रास्ताविकामध्ये कार्यक्रमाच्या आयोजनाची भूमिका मांडली. सुनील वालावलकर यांनी सूत्रसंचालन केले.