पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे विस्तारीकरण सुरू होणार असल्याने आठ महिन्यानंतर सल्लागार समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्यानुसार समितीचे अध्यक्ष केंद्रीय नागरी हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडून पाच जणांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सचे (एमसीसीआय) माजी अध्यक्ष सुधीर मेहता, सामाजिक कार्यकर्ते अमित परांजपे, माजी नगरसेवक अनिल टिंगरे, अभिजीत पवार आणि आणि अखिलेश जोशी या पाच व्यक्तींची नेगमणूक करण्यात आली आहे. पुण्याचे खासदार आणि समितीचे अध्यक्ष या नात्याने मोहोळ यांनी पाच नावे भारतीय विमानतळ प्राधिकरणाला कळवली होती. त्यानुसार नियुक्ती करण्यात आली आहे.

गिरीश बापट यांचे मार्च २०२३ मध्ये निधन झाल्यानंतर पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ समितीचे अध्यक्षपद रिक्त होते. त्यानंतर पोटनिवडणूक न होता थेट मे २०२४ मध्येच लोकसभा सार्वत्रिक निवडणूक झाली. मोहोळ खासदार होऊन त्यांना केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्रिपद देण्यात आले. शहराचा खासदार समितीचा अध्यक्ष असल्याने आठ महिने उलटून गेले, तरी समिती स्थापन झाली नव्हती. दरम्यानच्या काळात पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनलचे काम करण्यात आले. तसेच, नव्याने धावपट्टी विस्तारीकरण, जुने टर्मिनल दुरुस्तीकरण, धावपट्टी विस्तारीकरण, हवाई प्रवाशांच्या दृष्टीने पायाभूत सुविधांबाबतची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामुळे हवाई तज्ज्ञांकडून आणि प्रवाशांकडून वारंवार तक्रारी करण्यात आल्या होत्या. अखेर आठ महिन्यानंतर पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ सल्लागार समितीतील सदस्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे जाहीर करण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुणे विमानतळावर सोयी सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असून, येत्या वर्षभरात धावपट्टीचा विस्तारही होत आहे. या पार्श्वभूमीवर या समितीत काम करण्याची संधी मिळणे निश्चितच महत्त्वाचे आहे. प्रवाशांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आणि आधुनिक सोयी उपलब्ध करुन देण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल. – अमित परांजपे, नवनियुक्त सदस्य, पुणे विमानतळ सल्लागार समिती