पिंपरी : कुंडमळा येथील लोखंडी पादचारी पूल कोसळून रविवारी झालेल्या दुर्घटनेनंतर काही जण पाण्यात वाहून गेल्याच्या शक्यतेने सोमवारी (१६ जून) दुपारी दोन वाजेपर्यंत शोधमोहीम राबविण्यात आली. बोटी, ड्रोनद्वारे शोध घेण्यात आला. मात्र, कोणीही आढळून आले नाही; तसेच कोणी बेपत्ता असल्याची तक्रार नसल्याने शोधकार्य थांबविण्यात आले. दरम्यान, ५० जखमींपैकी ३५ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. जखमींपैकी ११ जणांवर अतिदक्षता विभागात, तर चौघांवर सर्वसाधारण कक्षात उपचार सुरू आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत वर्षा विहारासाठी आलेले पर्यटक रविवारी नदीपात्रात पडले. चार पर्यटक मृत्युमुखी पडले, तर ५० जण जखमी झाले. काही पर्यटक इंद्रायणी नदीत वाहून गेल्याच्या शक्यतेने सोमवारी शोधकार्य राबविण्यात आले. पोलिसांनी रायगड आपत्ती व्यवस्थापन पथक, वन्यजीव रक्षक मावळ, शिवदुर्ग मित्र लोणावळा या स्थानिक आपत्ती व्यवस्थापन पथकांसह शोधमोहीम राबविली. बोटींमधून तसेच ड्रोनद्वारेही नदीपात्रात शोधकार्य करण्यात आले. परंतु, कोणीही आढळून आले नाही. आणखी कोणी व्यक्ती बेपत्ता असल्याची तक्रारही पोलिसांकडे आली नसल्याने शोधकार्य थांबविण्यात आले. तळेगाव एमआयडीसीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव यांनी ही माहिती दिली.म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांना बेपत्ता नागरिकांबाबत लक्ष ठेवण्यास कळविण्यात आले आहे. पाण्यात सहा दुचाकी बुडाल्या होत्या. त्यांच्या मालकांचा शोध लागला असून, त्यातील एक दुचाकी मृत्यू झालेले रोहित माने यांची आहे.
पूल बंद असतानाही पर्यटकांची गर्दी
कोसळलेला पूल रहदारीसाठी बंद करण्यात आला होता. त्याबाबत पुलाच्या सुरुवातीला फलकदेखील लावण्यात आला आहे. असे असताना नागरिक या पुलाचा रहदारीसाठी वापर करत होते. केवळ पादचाऱ्यांसाठी असलेल्या या पुलावरून नागरिक दुचाकीही घेऊन जात होते. एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी झाल्याने पूल कोसळल्याचे स्थानिकांनी सांगितले.
स्थानिकांना १४ किलोमीटरचा वळसा
कुंडमळा येथील पूल कोसळल्याने स्थानिकांची मोठी गैरसोय झाली. बेगडेवाडी रेल्वे स्थानकाकडे येणाऱ्या शेलारवाडी, कुंडमळा, सांगुर्डी, इंदोरी, कान्हेवाडी, येलवाडी, सुदवडी या भागातील सुमारे २० हजार नागरिकांचा संपर्क तुटला आहे. विद्यार्थी, दूध विक्रेते, फूल विक्रेते, शेतकरी यांना पिंपरी-चिंचवड, पुणे शहराकडे येण्यासाठी इंदोरी मार्गे तळेगाव दाभाडे असा १४ किलोमीटर अंतराचा वळसा घालावा लागणार आहे.
निधी मंजूर; पण कामाला विलंब
शेलारवाडी येथे संरक्षण दलाच्या डेपोकडून दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी इंद्रायणी नदीवर नवीन पूल बांधण्यासाठी शासनाने आठ कोटी रुपयांचा निधी ११ जुलै २०२४ रोजी मंजूर केला आहे. पुलाची संरचना, निविदा प्रक्रिया, संरक्षण विभागाची मान्यता यामध्ये एक वर्षाचा कालावधी गेला. १० जून २०२५ रोजी पुलाच्या कामाचा कार्यारंभ आदेश दिला आहे. पण, अद्याप कामाला सुरुवात झाली नाही.
संरक्षण विभागाच्या परवानग्या आणि इतर कारणांमुळे नवीन पुलाचे काम सुरू होण्यास विलंब झाला. जुना पूल ३२ वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेने बांधला होता. त्याचे स्थापत्यविषयक लेखापरीक्षण झाले नव्हते. रवींद्र भेगडे माजी तालुकाध्यक्ष, भाजप