पुणे : राज्यातील करोना रुग्णसंख्येत वाढ सुरूच असून, गेल्या २४ तासांत ९८ नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यात पुणे आणि मुंबईत सर्वाधिक रुग्ण असून, प्रत्येकी ३४ रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवडमध्ये १०, तर पुणे ग्रामीणमध्ये ४ करोना रुग्ण आढळून आले.
सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात गेल्या २४ तासांत करोनाचे ९८ रुग्ण आढळले. त्यात मुंबई ३४, पुणे महापालिका ३४, पिंपरी-चिंचवड महापालिका १०, पुणे ग्रामीण ४, ठाणे ४, सांगली महापालिका व छत्रपती संभाजीनगर महापालिका प्रत्येकी ३, कल्याण महापालिका २, वसई विरार महापालिका, सातारा, छत्रपती संभाजीनगर, नागपूर महापालिका प्रत्येकी १ अशी रुग्णसंख्या आहे.
राज्यात १ जानेवारी ते ५ जूनपर्यंत १४ हजार ५६५ संशयित करोना रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात १ हजार १६२ रुग्णांना करोनाचे निदान झाले. त्यात मुंबईत सर्वाधिक ५७५ रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यातील करोनाची सक्रिय रुग्णसंख्या ५४८ असून, ५९७ रुग्ण बरे झाले आहेत.
राज्यात जानेवारीपासून आतापर्यंत करोनाच्या १७ रुग्णांचा मृत्यू झाला असून, त्यातील १६ रुग्ण सहव्याधीग्रस्त होते. मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये मूत्रपिंडविकार, कर्करोग, ब्रेन स्ट्रोक, फुफ्फुस विकार, श्वसनविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब, क्षयाचा आजार होता. राज्यात श्वसनविकाराच्या रुग्णांचे सर्वेक्षण सुरू असून, त्यांची करोना चाचणी केली जात आहे.
‘राज्यात सध्या करोनाचे तुरळक रुग्ण आढळून येत आहेत. रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे दिसून येत असून, रुग्णालयात रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण अतिशय कमी आहे,’ अशी माहिती आरोग्य विभागाच्या सहसंचालिका डॉ. बबिता कमलापूरकर यांनी दिली.
राज्यातील करोना संसर्ग (१ जानेवारी ते ५ जून)
करोना चाचण्या : १४ हजार ५६५
एकूण रुग्ण : १ हजार १६२
सक्रिय रुग्ण : ५४८
बरे झालेले रुग्ण : ५९७
मुंबईतील रुग्ण : ५७५
मृत्यू : १७