पुणे : ‘कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाची भीती बाळगण्यापेक्षा त्याचा परिणामकारकपणे उपयोग करणे महत्त्वाचे असून, सनदी लेखापाल अभ्यासक्रमात ‘एआय’चा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २०२७ पासूनचे सनदी लेखापाल ‘एआय’ प्रशिक्षित असतील,’ अशी माहिती इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउन्टंट्स ऑफ इंडियाचे (आयसीएआय) अध्यक्ष चरणज्योत सिंग नंदा यांनी दिली.
सनदी लेखापाल (सीए) अभ्यासक्रमाची परीक्षा आता वर्षातून तीन वेळा घेतली जात असून, विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीचा निधी ५०० कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. ‘आयसीएआय’तर्फे आयोजित ‘एआय इनोव्हेशन समिट २०२५’ या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनानंतर नंदा यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते.
नंदा म्हणाले, ‘कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत ‘आयसीएआय’अंतर्गत स्वतंत्र समिती नियुक्त करण्यात आली आहे. तसेच, नोंदणीकृत सनदी लेखापालांसाठी ‘एआय’च्या वापराचे प्रशिक्षण वर्गही आयोजित करण्यात येत आहेत. त्यानुसार आतापर्यंत ५०० हून अधिक एआय प्रशिक्षण वर्गांच्या माध्यमातून २५ हजारांहून अधिक नोंदणीकृत सनदी लेखापालांनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे. सनदी लेखापालांना या तंत्रज्ञानाचा परिणामकारकता, कामातील अचूकतेसाठी वापर करणे शक्य आहे. या दृष्टीनेच सनदी लेखापाल अभ्यासक्रमातही कृत्रिम बुद्धिमत्ता विषय समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशभरातील ८२ विद्यापीठांशी ‘आयसीएआय’चे सामंजस्य करार आहेत. त्याशिवाय हैदराबादसह देशभरात नऊ ठिकाणी संशोधन केंद्राची स्थापना करण्यात येत आहे. गेल्या काही वर्षांपासून सनदी लेखापाल अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा ओढाही वाढत आहे.’
‘एआयमुळे अनेक रोजगारांची निर्मिती होणार आहे. मानवी बुद्धिमत्तेला तंत्रज्ञानाची जोड मिळाल्याने विकासाचा वेग झपाट्याने वाढणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता हा व्यवसायाचा अविभाज्य भाग झाला आहे,’ असे प्रसन्नकुमार यांनी नमूद केले.
हजारहून अधिक ‘सीएं’चा सहभाग
या परिषदेत १००० पेक्षा अधिक सनदी लेखापालांनी या परिषदेत भाग घेतला. ‘आयसीएआय’चे उपाध्यक्ष प्रसन्न कुमार डी., सचिव डॉ. जयकुमार बत्रा, पुणे विभागीय कार्यालयाचे अध्यक्ष सचिन मिणियार, एआय समितीचे अध्यक्ष उमेश शर्मा या वेळी उपस्थित होते. ‘आयसीएआय’च्या पुणे शाखेतर्फे आयोजित या परिषदेचे आयोजन केंद्रीय समितीचे सदस्य चंद्रशेखर चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय समिती सदस्य राजेश अग्रवाल, रेखा धामणकर, अभिषेक धामणे, पुणे शाखेचे उपाध्यक्ष प्रणव आपटे, सचिव नीलेश येवलेकर, खजिनदार नेहा फडके यांनी केले.