बारामती : राजकारण करणाऱ्यांनी ठेकेदार बनू नये आणि ठेकेदारी करायची असेल, तर राजकारणात येऊ नका, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. बारामतीतील पिंपळे येथील ग्रामसचिवालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते.

ते म्हणाले, ‘राजकारण करायचे असेेल त्यांनी ठेकेदार बनू नये आणि ठेकेदार व्हायचे असेल, तर त्यांनी राजकारणात येऊ नये. ठेकेदार चांगला असेल, तर विकासकामेही चांगली होतात, अन्यथा सरकारला त्रास होतो.’‘मुंबईत १९४ कोटींच्या मॉलचे काम सुरू असून, महिलांनी तयार केलेल्या वस्तूंची विक्री तेथे होणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात १५ कोटींचा मॉल आणि तालुकास्तरावरही मॉल उभारण्याची योजना आहे’, असे पवार यांनी सांगितले.

‘पूरग्रस्तांसाठी राज्य बँकांना १० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. आरोप करणारे करत राहतात, मात्र कामे सुरू आहेत. आतापर्यंत ४४ लाख घरे मंजूर करण्यात आली असून, मोटारसायकल असणाऱ्यांनाही घर देण्याची योजना आहे’, असे पवार यांनी स्पष्ट केले.‘वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमार्फत शेतकऱ्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरासाठी १८ हजार रुपये देण्यात येत आहेत. ही रक्कम कृषी विभागामार्फत देण्याचा विचार आहे’, असेही पवार म्हणाले.