पुणे : ‘कृषी क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी आत्मसात करावे, यासाठी राज्यातील सहाही विभागांमध्ये प्रत्येकी एक ‘सेंटर फाॅर इनोव्हेशन अँड डेव्हलपमेंट इन स्मार्ट ॲग्रिकल्चर’ (सीडसा) केंद्र उभारण्यात येईल,’ अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी येथे केली. दरम्यान, ‘महात्मा फुले कृषी विद्यापीठातील प्रयोगशाळा औंधमधील पशुसंवर्धन विभागाच्या प्रयोगशाळेच्या धर्तीवर अधिक सुसज्ज करण्यात येईल,’ असे आश्वासनही त्यांनी दिले.

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढाकारातून कृषी विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि कृषी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या देशातील पहिल्या ‘पुणे आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथाॅन’चे उद्घाटन रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत झाले. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. राज्याचे कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, आमदार बाबाजी काळे, चेतन तुपे, बापू पठारे, कृषी आयुक्त सूरज मांढरे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, महापालिका आयुक्त नवलकिशोर राम, मराठा चेंबर ऑफ काॅमर्सचे महासंचालक प्रशांत गिरबने यांच्यासह विविध कृषी विद्यापीठांचे आजी-माजी कुलगुरू उपस्थित होते.‘राज्यातील अमरावती, नागपूर, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगरासह कोकण विभागात ‘सीडसा’ची केंद्रे सुरू करण्यात येतील. त्यासाठी पुरवणी अर्थसंकल्पात ९० कोटींची तरतूद करण्यात येईल,’ असे पवार यांनी सांगितले.

ते म्हणाले,‘राज्यातील शेतकरी विविध प्रयोग करीत आहेत. नवनवीन तंत्रत्रानाचा वापर शेतीमध्ये झाला पाहिजे. त्यासाठी शेती व्यवसायात कृत्रिम प्रज्ञेला (एआय) राज्य शासनाकडून प्रोत्साहन दिले जात आहे. हवामान बदलांच्या संकटात शेती आणि शेतकरी सापडला आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर करून शेती शाश्वत करण्याचे राज्य शासनाचे प्रयत्न आहेत.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘कृषी क्षेत्रात मनुष्यबळाच्या अभावी भविष्यात अडचणी निर्माण होण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटक राज्यात चाळीस आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी एकत्र येत मानवविरहित अवजारे आणि तंत्रज्ञानाचे विकसन करण्यास सुरुवात केली आहे. मानवविरहित ट्रॅक्टर, ड्रोन आणि अन्य तंत्रज्ञानाचा त्यामध्ये समावेश असून कृषी हॅकेथाॅनच्या माध्यमातून नवनवीन संशोधन शेतीमध्ये येईल,’ असे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.