बारामती : बारामती विमानतळ परिसराच्या विकासासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार करून या विमानतळावर ‘नाईट लँडिंग’ची सुविधा सुरू करण्यासाठी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) तयार केलेला सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे देण्याचे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीत बारामती विमानतळावर ‘नाईट लँडिंग’ सुविधा सुरू करण्यासह या विमानतळाची धावपट्टी आणि परिसराच्या विकास; तसेच यवतमाळ, धाराशिव, लातूर आणि नांदेड विमानतळांवरही नाईट लँडिंग सुविधा सुरू करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
बारामती विमानतळावर ‘नाईट लँडिंग’ची सुविधा सुरू करण्यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने कार्यवाही करावी. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) तयार केलेला ‘नाईट लँडिंग’चा सविस्तर प्रकल्प अहवाल महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे हस्तांतरित करावा. उद्योग विभागाने याबाबत ते निर्णय घ्यावेत. बारामती विमानतळाच्या विकासासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार करावा. त्यासाठी एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या सहकार्याने सर्वेक्षण करून खर्चाचे अंदाजपत्रक बनवण्यात यावे, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत दिले.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘या निर्णयांमुळे बारामतीसह राज्यातील अन्य विमानतळांच्या विकासाला गती मिळेल. तसेच उद्योग आणि पर्यटन क्षेत्राला चालना मिळेल,’ दरम्यान, बारामतीच्या विमानतळावर नाईट लँडिंगची सुविधा करण्याबाबत उपमुख्यमंत्री पवार हे पाठपुरावा करत आहेत. या सुविधेमुळे स्थानिक उद्योगधंद्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर बाजारपेठ उपलब्ध होऊ शकणार आहे. ग्रामीण भागातील शेती उत्पादनांच्या निर्यातीलाही चालना मिळेल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने एअरपोर्ट ॲथॉरिटी ऑफ इंडियाच्या समन्वयाने बारामती विमानतळाचा विकास करण्यासाठी आवश्यक ते सर्वेक्षण करावे. बारामती विमानतळाच्या विकासासाठी संभाव्य खर्चाचे अंदाजपत्रक महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने तयार करावे. – उपमुख्यमंत्री, अजित पवार