राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाढत्या करोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात टाळेबंदी लागणार की नाही यावर स्पष्टच भूमिका घेतली आहे. “राज्यात सध्या रूग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे सध्या रात्रीची संचारबंदी आणि दिवसाची जमावबंदी आहे. मात्र, राज्यातील ऑक्सिजनची मागणी ७०० मेट्रिक टनापेक्षा अधिक झाली तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील टाळेबंदीवर निर्णय घेतील,” असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं. ते पुण्यात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अजित पवार म्हणाले, “महाराष्ट्रातील जो नागरिक आहे त्याच्या जीवाशी कोणीच खेळून चालणार नाही. आरोग्य पहिलं चांगलं ठेवावं लागेल. आत्ता देखील करोना रूग्णांची संख्या वाढली आहे हे तुम्ही पाहत आहात. असं असलं तरी आपण रात्रीची संचारबंदी आणि दिवसाची जमावबंदी केली आहे. बाकी आपण सर्व चालू ठेवलं. मात्र, नियमांचं पालन करून सर्व चालू ठेवलं. तशाच पद्धतीने आमचा पुढे जाण्याचा प्रयत्न आहे.”

“राज्यात ऑक्सिजनची मागणी फार मोठ्या प्रमाणावर वाढली. महाराष्ट्रात ७०० मेट्रिक टनापेक्षा अधिक मागणी झाली, तर मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील निर्बंधांबाबतचा निर्णय घेतील,” असंही अजित पवार यांनी नमूद केलं.

अजित पवारांकडून पुणे जिल्हा बँक अध्यक्ष-उपाध्यक्षांच्या नावाची घोषणा

अजित पवार म्हणाले, “एखाद्या जागेचा अपवाद वगळता काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्रित निवडणूक लढवली. सगळे एका विचाराचे लोक निवडून आले आहेत. आज आम्ही पुरंदर तालुक्यातून निवडून आलेल्या दिगंबर दुर्गाडे यांना चेअरमन म्हणून संधी दिली आहे. व्हाईस चेअरमन म्हणून पहिल्यांदा बँकेत निवडून आलेले सुनील चांदेरे यांची निवड केली.”

“चांदेरे हे मुळशी तालुक्यातील अ वर्गाचं प्रतिनिधित्व करतात. दिगंबर दुर्गाडे ड वर्गाचं ओबीसी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. सर्वांनी या दोघांना संधी देण्याचं काम एकमताने केलं,” अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

“आता बँका चालवणं आधीच्या तुलनेत स्पर्धात्मक”

अजित पवार पुढे म्हणाले, “या दोघांवरही मोठी जबाबदारी आहे. आता बँका चालवणं आधीच्या तुलनेत स्पर्धात्मक झालं आहे. कारण वेगवेगळ्या प्रकारची नियमावली येते. त्या नियमावलीचं तंतोतंत पालन करून शेतकऱ्यांना, सहकारी संस्था, पतसंस्थांना कर्जपुरवठा करायचा असतो. हा कर्ज पुरवठा करताना दिगंबर दुर्गाडे आणि सुनील चांदेरे दोघेही या नियमांचा विचार करतील. आमचा त्यांना पाठिंबा आहे.”

हेही वाचा : राष्ट्रवादीला गल्लीतला पक्ष म्हणणाऱ्या फडणवीसांना अजित पवारांचं उत्तर; म्हणाले, “मला खासदार…”

“आम्ही निवड झालेल्यांना पारदर्शक कारभार करायला सांगितलं आहे. कुठेही चुकीच्या गोष्टी करता कामा नये. खास बात तर अजिबात करता कामा नये. कागदांची पुर्तता आणि धोरणात बसत असेल तर कोणत्याही गटातटाचा, जातीधर्माचा असो त्याला मदत झाली पाहिजे. हीच अनेक वर्षांपासून पुणे जिल्हा बँकेची परंपरा आहे,” असंही पवारांनी नमूद केलं.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar comment on possibility of lockdown in maharashtra amid rise in corona infection svk 88 pbs
First published on: 15-01-2022 at 16:37 IST