पुणे : भोर-वेल्हा पुण्याच्या शेजारी असूनही तेथे एमआयडीसी नाही, मोठे कारखाने नाहीत. काहींनी उमेदवार म्हणून मत मागताना भोर-वेल्ह्यात एमआयडीसी आणली नाही, तर मत मागायला येणार नाही, असे सांगितले होते. मी बारामतीमध्ये चेहरामोहरा बदलला आणि आता तुमच्यासमोर मत मागायला आलो आहे. मला विकास करायची आवड आहे. पिंपरी-चिंचवडमध्येही मी बदल करून दाखवला. आम्ही ढगात गोळ्या मारत नाही, वेळ मारून नेत नाही. मी इतरांसारखे खोटे बोलत नाही. तुम्ही मला निवडून द्या, मी २०१९ पर्यंत एमआयडीसी करेन, पण आणली नाही. माझ्यासारख्याला शरम वाटली असती मते मागताना, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांची नक्कल करत त्यांच्यावर टीका केली.

महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ भोर-वेल्हा-मुळशी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. ते म्हणाले, बारामतीच्या आताच्या खासदारांनी १५ वर्षांत तुमच्यासाठी काय केले? याचा शांतपणे विचार करा. त्यांच्या १५ वर्षांच्या कारकीर्दीपेक्षा यंदा घड्याळाचा खासदार निवडून आल्यास आमच्या खासदाराची पाच वर्षांची कारकीर्द नक्कीच उजवी असेल. केंद्राचा जास्तीत जास्त निधी आणणारी आणि केंद्राच्या विविध योजना तुमच्या दारापर्यंत आणणारी कारकीर्द असेल. बारामतीमधून घड्याळ चिन्हावर निवडून आलेला खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदींना विरोध करायचा. परिणामी बारामती मतदारसंघात केंद्राचा निधी गेल्या दहा वर्षांत किती आला?

हेही वाचा…माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांचे दीर्घ आजाराने निधन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, यंदा घड्याळावर निवडून येणारा खासदार पंतप्रधान मोदींसोबत आहे. त्यामुळे केंद्राचा खूप निधी मतदारसंघात येईल. माझीच कामे काहींनी पुस्तिका छापून स्वत: केल्याचे सांगत आहेत. बारामतीमधील सर्व इमारती मी स्वत: उभ्या केल्या आहेत. आताच्या खासदारांनी हे तुम्ही केले, तर भोर, वेल्हा येथे काय केले सांगा. केवळ भाषणे करून पोट भरते का? कृती करावी लागते. तीनवेळा निवडून दिले आणि भोर-वेल्हा-मुळशीला काय मिळाले? यंदा मी सांगतो, त्या उमेदवाराला निवडून द्या. वाढप्या ओळखीचा असेल, तर पंगतीत भरपेट जेवण मिळते. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर एमआयडीसीचा प्रश्न सोडवू, हा माझा शब्द आहे.