पुणे : गेल्या चार वर्षांत महापालिकेत नगरसेवक नाहीत. त्यामुळे अनेक नागरी समस्या खोळंबल्या आहेत. या समस्यांनी हैराण रहिवाशांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘जनसंवाद’ यात्रेत रांगा लावत तक्रारींचा पाढा वाचला. सकाळी नऊ ते दुपारी एक या चार तासांत सुमारे दीड हजार निवेदने देत खडकवासला विधानसभा परिसरातील नागरिकांनी अजित पवार यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या वतीने खडकवासला विधानसभा मतदारसंघात नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी ‘जनसंवाद यात्रे’चे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी पवार यांच्यासमोर परिसरातील रहिवाशांनी समस्या मांडल्या. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर, महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) आयुक्त योगेश म्हसे यांच्यासह विविध विभागांचे पदाधिकारी उपस्थित होते.

नागरिकांच्या तक्रारी

‘सिंहगड रस्ता परिसरातून सुमारे तीन हजार नागरिक कामानिमित्त हिंजवडी, कोथरूड परिसरात जात असतात. मात्र, पुणे महानगर परिवहन मंडळाच्या पुरेशा बस आणि मेट्रो स्थानकापर्यंत जाण्यासाठी सोय नसल्याने त्यांना त्रासाला सामोरे जावे लागते. कचरा, सांडपाण्याचे व्यवस्थापन नसल्याने वारजे, आंबेगाव बुद्रुक परिसरातील रहिवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. पिण्याचे पाणी येत नाही, वीजपुरवठा वारंवार खंडित होतो, रोजच वाहतूककोंडी होते,’ अशा समस्या नागरिकांनी अजित पवार यांच्यासमोर मांडल्या. नांदेड सिटी परिसरातील सुमारे ८० हजार नागरिकांच्या वतीने ‘गॅस दाहिनी’ सुरू करण्याचीही मागणी करण्यात आली.

नागरिकांसमोर हात जोडले; अधिकाऱ्यांची कानउघाडणी

विकासकामांच्या पाहणीसाठी अजित पवार अहिरेगाव परिसरात पोहोचले. स्थानिक रहिवासी समस्या मांडत असताना एकाने त्यांना मंदिरात येण्याचा आग्रह केला. त्या वेळी अजित पवार यांनी नागरिकांसमोर हात जोडले. ‘मी पहाटे पाच वाजता उठतो. एक तर मला देव देव करायला लावा किंवा विकासकामे करायला सांगा,’ अशी भावना त्यांनी व्यक्त केली. याच गावात रिंग रोड आणि रस्त्यांच्या समस्यांबाबत चर्चा सुरू असताना ‘पीएमआरडीए’चे एक अधिकारी वेळेवर उपस्थित नव्हते. ‘कुठे जाऊन बसता हो तुम्ही,’ असे म्हणत दोन मिनिटे उशीर का झाला, अशी विचारणा त्यांनी संबंधित अधिकाऱ्याकडे केली.

‘सेवा रस्त्यांसाठी रोख मोबदला’

वारजे परिसरातील वाहतूककोंडीची समस्या सोडविण्यासाठी सेवा रस्त्यांच्या भूसंपादनाचा निर्णय घेतला. मात्र, मोबदल्याच्या वादामुळे हे काम रखडले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हस्तक्षेप करून जमीनमालकांच्या मागणीनुसार हस्तांतरणीय विकास हक्काऐवजी (टीडीआर) रोख स्वरूपात मोबदला देण्यात येणार असल्याची घोषणा केली.

‘शिवणे येथील पुलाची उंची वाढवणार’

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धायरी आणि नांदेड सिटी परिसरात विकासकामांचा आढावा घेतला. त्यांनी वारजे-शिवणे पुलाच्या कामाची पाहणी केली. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्यानंतर शिवणे पूल पाण्याखाली जातो. त्यामुळे या पुलाची उंची वाढवण्याचे आदेश अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिले.