पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे रणांगणात उतरले असून, पुण्यात ‘जनसंवाद’च्या माध्यमातून त्यांनी मतदारांशी संवाद साधण्यास सुरुवात केली. ‘नागरिकांचे प्रश्न सुटावेत, यासाठी राज्यभर विविध मतदार संघांमध्ये ‘जनसंवाद’ कार्यक्रम घेतले जाणार आहेत,’ अशी घोषणाही पवार यांनी केली.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने मतदारांशी संवाद साधणार आहेत. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून ‘जनसंवाद’ हा उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यातून नागरिकांच्या तक्रारींचे जागेवर निवारण करण्यात येणार आहे. या ‘जनसंवादा’ला हडपसर विधानसभा मतदारसंघापासून आरंभ करण्यात आला. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, अतिरिक्त पोलीस आयुक्त शर्मा यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘नागरिकांचे प्रश्न, अडचणी सुटल्या पाहिजे, यासाठी जास्तीत जास्त मतदार संघात हे कार्यक्रम घेतले जाणार आहेत. हडपसर येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमात नागरिकांनी पाणी, कचरा, रस्त्यांची दुरावस्था यासह रखडलेली मोजणी, अतिक्रमण आदी विषयांवर तक्रारी मांडल्या. प्रत्येक मतदारसंघांमध्ये असे कार्यक्रम घेऊन नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणार आहे’.

बालगुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पावले

‘आयुष कोमकर हत्या प्रकरणी आंदेकर टोळीविरूद्ध ‘मकोका’ लावण्यात आला आहे. पोलिसांनी कोणताही राजकीय दबावाला बळी न पडता त्यांचे काम करावे, असे सूचना पोलीस खात्याला दिल्या आहेत. अल्पवयीन मुले चुकीच्या मार्गाने जात असल्याने अल्पवयीन मुलांचे वय कमी करण्याची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे.

बालगुन्हेगारीला आळा घालण्यासाठी अल्पवयीन आरोपी असला तरी संबंधितावर कारवाई करता आली पाहिजे, यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे.’ असे अजित पवार यांनी सांगितले. ‘आंदेकर कुटुंब यापूर्वी काँग्रेसमध्ये होते. खून, मारामाऱ्या करणे ही विकृती आहे. कोणत्याही पक्षाला आणि नेत्याला असे वाटत नाही की, आपल्या नगरसेवकाने असे काम करावे.’ असेही पवार म्हणाले.

‘त्या’ प्रकरणावर बोलण्यात नकार

करमाळ्याच्या पोलीस उपअधींक्षक अंजना कृष्णा या प्रकरणावर बोलण्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नकार दिला. ‘माझी भूमिका मांडली आहे. समाजमाध्यमांवरून स्पष्टीकरण दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितले आहे. आता या विषयावर बोलणार नाही’ असे पवार म्हणाले.

‘कोणीही नाराज नाही’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये नाराजी असल्याच्या चर्चेचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खंडन केले. ‘आमच्यामध्ये कोणीही नाराज नाही. आता स्टॅम्प पेपर वर लिहून देऊ का?’ असेही पवार म्हणाले. ‘आम्ही तिघे एकत्रित बसतो. त्यावेळेस कधीही नाराजी असल्याचे जाणवले नाही. राज्याचा कारभार चांगला व्हावा असाच आमच्या तिघांचा प्रयत्न असतो’ असेही पवार यांनी स्पष्ट केले.

चार हजारापेक्षा अधिक तक्रारी

हडपसर येथे झालेल्या कार्यक्रमात ३० सरकारी विभाग सहभागी झाले होते. या जनसंवाद कार्यक्रमात ४ हजारापेक्षा अधिक तक्रारी मांडण्यात आल्या. त्यापैकी १५०० तक्रारींचे निराकरण जागेवरच करण्यात आले. यामध्ये पाणीपुरवठा, वाहतूक कोंडी, रस्त्यावर पडलेले खड्डे, बेकायदा बांधकामे यांचा समावेश होता.