पुणे : महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडून आव्हान मिळण्याची शक्यता आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अद्याप पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली नसली, तरी या वेळी निवडणुकीला राजकीय वळण मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. राज्य कबड्डी संघटनेची साथ सोडून अजित पवार यांनी खो-खो संघटनेकडून अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे, तर मोहोळ महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाकडून आज, शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती कुस्तीगीर संघाचे सरचिटणीस योगेश दोडके यांनी दिली.

महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेची निवडणूक जाहीर झाल्यापासून या ना त्या कारणाने चर्चेत राहिली आहे. पहिल्यांदा मतदानास पात्र संघटनेच्या नावावरून संघर्ष निर्माण झाला. कबड्डी, कुस्ती, जलतरण अशा प्रमुख संघटनांना सुरुवातीला या यादीतून वगळण्यात आले होते. या संदर्भात संघटना आक्रमक झाल्यावर त्यांच्यासह एकूण ३१ संघटना मतदानासाठी पात्र धरण्यात आल्या. याच दरम्यान कबड्डी संघटनेवर प्रशासक नियुक्त करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला. प्रशासकाकडे कार्यभार सोपविण्यापूर्वीच मतदारांची नावे महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेकडे पाठविण्यात आली. या संदर्भात माहिती घेतली असता न्यायालयाचा निकाल लागण्यापूर्वीच ही नावे पाठविण्यात आली असे महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. जलतरण संघटनेकडून मतदानासाठी मतदारच पाठविण्यात आलेला नाही. यामुळे आता २ नोव्हेंबरला होणाऱ्या निवडणुकीत ३१ पात्र संघटनांपैकी ३० संघटनांमधून ६० मतदार मतदान करणार आहेत.

उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत सुरू झाल्यावर तातडीने अजित पवार यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज भरल्याचे समजते. खो-खो संघटनेकडून त्यांनी हा अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष म्हणून पवार यांच्या चार वर्षांचे तीन कार्यकाळ पूर्ण झाले आहेत. त्यामुळे घटनेनुसार पवार निवडणुकीसाठी अपात्र ठरत असताना त्यांचाच अर्ज सर्वप्रथम आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अर्ज भरण्याची मुदत ११ ऑक्टोबर रोजी संपणार असून, त्यानंतर छाननी आणि त्यावरील आक्षेपाची चौकशी १४ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. त्यानंतर पात्र उमेदवारांची यादी १४ ऑक्टोबर रोजी जाहीर केली जाईल.