बारामती : बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या‘श्री नीळकंठेश्वर पॅनेल’ने निर्णायक आघाडी घेतली असून, ‘सहकार बचाव शेतकरी पॅनेल’ला धक्का बसला आहे. या पॅनेलचे प्रमुख रंजनकुमार तावरे हे पराभूत झाले आहेत. मतमोजणी सुरू असून श्री नीळकंठेश्वर पॅनेलचे नऊ उमेदवार विजयी घोषित करण्यात आले असून, अन्य नऊ ठिकाणी या पॅनेलचे उमेदवार आघाडीवर आहेत.
कारखान्याचे माजी अध्यक्ष, भाजप नेते चंद्रराव तावरे हे सांगवी गटातून आघााडीवर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे ‘बळीराजा सहकार बचाव पॅनेल’ आणि कष्टकरी शेतकरी संघर्ष समितीच्या पॅनेलचा निभाव लागला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
या कारखान्याच्या मतमोजणीला मंगळवारी सकाळी नऊ वाजता सुरुवात झाली. आतापर्यंत ‘ब’ गटातून निवडणूक लढविणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह नऊ उमेदवार विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले आहे. कारखान्याचे माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे आणि रंजनकुमार तावरे यांच्या नेतृत्त्वाखाली ‘सहकार बचाव शेतकरी पॅनेल’ निवडणूक लढवत आहे. त्यापैकी रंजनकुमार तावरे यांना पराभवाचा धक्का बसला आहे.
रंजनकुमार तावरे हे पहिल्या फेरीत आघाडीवर होते. मात्र, दुसऱ्या फेरीअखेर त्यांचा ५९३ मतांनी पराभव झाला. रंजनकुमर तावरे हे अनेक वर्षे संचालक आणि माजी अध्यक्षही आहेत. मतमोजणी सुरू झाल्यानंतर त्यांनी ‘राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे २० उमेदवार निवडून आले, तर राजकारण सोडून देईल’ असे वक्तव्य केले होते.
माळेगाव गटातून रंजनकुमार तावरे हे उभे होते. या गटातून नीलकंठेश्वर पॅनलचे उमेदवार, कारखान्याचे माजी अध्यक्ष बाळासाहेब तावरे, त्यांचे सहकारी शिवराज उर्फ रणजीत जाधवराव आणि राजेंद्र बुरुंगले हे तीन उमेदवार विजयी झाले. रंजनकुमार तावरे हे चौथ्या क्रमांकावर फेकले गेले. या गटातून तीनच उमेदवार निवडून द्यायचे होते. त्यामुळे तावरे यांना पराभव पत्करावा लागला.
फेरमतदानाची मागणी
निकाल जाहीर झाल्यानंतर रंजनकुमार तावरे यांनी फेरमतदानाची मागणी केली. त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता. मात्र, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांची मागणी फेटाळली.
अजित पवार गटाचे विजयी उमेदवार
- ‘ब’ गट – या गटातून अजित पवार हे विजयी झाले. त्यांनी सहकार बचाव शेतकरी पॅनेलचे भालचंद्र देवकाते यांचा पराभव केला.
- अनुसूचित जाती व जमाती प्रवर्ग गट – रतनकुमार भोसले विजयी. त्यांना ८६७० मते मिळाली. बापूराव गायकवाड यांना ७१८३ मते मिळाली. भोसले हे १४८७ मतांनी विजयी
- मागास प्रवर्ग गट – नितीन शेंडे विजयी. शेेंडे यांना ८४९४ मते मिळाली. रामचंद्र नाळे यांना ७३४१ मते मिळाली. शेंडे यांचा ११५३ मतांनी विजय.
- भटक्या विमुक्त जाती जमती प्रवर्ग गट – विलास देवकाते आणि महिला राखीवमधून संगीता कोकरे, ज्योती मुलमुले विजयी.
- माळेगाव गट – बाळासाहेब तावरे, शिवराज उर्फ रणजीत जाधवराव आणि राजेंद्र बुरुंगले विजयी. रंजनकुमार तावरे पराभूत